शिवसेनेचा सोमवारी कर्जमुक्तीसाठी शेतकरी मोर्चा

0

धुळे । राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे अशी शिवसेनेची आग्रही मागणी असून त्यासाठी आंदोलन केले जात आहे. कर्जमाफीची घोषणा होवूनही प्रत्यक्ष लाभ होत नसल्याने दसर्‍यापुर्वी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा, अशी घोषणा देत शिवसेनेने सोमवारी धुळ्यात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख हिलाल माळी व ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी दिली आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार आकड्यांची तरतूद करून नुसत्या तारखा जाहीर करीत आहेत. तर शिवसेनेने शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, हे अभियान राबवुन आंदोलन हाती घेतले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार मोर्चा
याआधी बँकांसमोर ढोल-बजाओ आंदोलन करून शिवसेनेने जाब विचारला आहे. आता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून सोमवार दि.11सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मालेगाव रोडवरील शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, कैलास पाटील, संजय गुजराथी, शानाभाऊ सोनवणे,भुपेश शहा, हिंमत महाजन, गंगाधर माळी, सौ.कविता क्षिरसागर, विशाल देसले,मनिष जोशी, विश्‍वनाथ पाटील, भरतसिंग राजपूत, दत्तु गुरव, परशुराम देवरे, चंद्रकांत देवरे आदींसह शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकार्‍यांनी केले आहे.