मुंबई : येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या असून, त्याही थोड्या आधी उरकण्याचा विचार भाजप श्रेष्ठींच्या मनात घोळत आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्रातही विधानसभा मध्यावधी निवडणुका घेतल्या, तर सहजगत्या स्वबबळावर बहुमताचा पल्ला मारता येईल, अशी या श्रेष्ठींना खात्री वाटते आहे. हार्दिक पटेलच्या आरक्षण आंदोलनानंतर गुजरातमध्येही स्थानिक संस्थात मिळालेले यश व महाराष्ट्रातही हाती आलेले यश, यामुळे भाजपचे श्रेष्ठी शिवसेनेची कटकट संपवायला उत्सुक आहेत.
त्याचा मार्ग मध्यावधी असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ताज्या अर्थसंकल्पी अधिवेशनात गोंधळ घालण्याच्या धमक्या सेनेने दिल्या होत्या. पण विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषणात व्यत्यय आणला, त्यापासून सेना दूर राहिल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हणूनच सत्तेतला मित्रही पाठीशी ठाम नसताना 19 आमदारांना निलंबित करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी धाडसी पाऊल उचलले आहे.
शेतकरी कर्जमाफीचा विषय असूनही सेनेने माघार घेतल्याने, हा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच मध्यावधी घेऊन पूर्ण बहुमताचा कौल मागण्याची इच्छा भाजपमध्ये बळावते आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणूका डिसेंबरला व्हायच्या असून, त्याचवेळी महाराष्ट्रातही विधानसभा उरकल्या, तर नियोजन व रणनीती आखण्यास सोपे जाईल असे त्यामागचे गणित आहे. उत्तर प्रदेशात मतदाराने दिलेला कौल बघता, आता महाराष्ट्रात फडणवीस व मोदी यांची जादू भाजपचे पारडे जड करणारी ठरू शकते. म्हणूनच राष्ट्रपती निवडणुकीनंतर विधानसभा बरखास्तीचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतील.