सोलापूर । सत्तेत असलेली शिवसेना नेहमी सत्तेतून बाहेर पडतो असे धमकावत असते. सेनेची ही धमकी म्हणजे जोकच आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली तर, नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता सुळे यांनी मौन बाळगले. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. खा. सुप्रिया सुळे केबीपी महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या संकेतामुळे शिवसेना काडीमोड करेल, असे स्पष्ट सांगता येणार नाही. कारण राणंंची स्वत:ची आयडॉलॉजी आहे, असे म्हणत खा. सुळे यांनी या विषयी बोलणे टाळले.
केवळ भाषणे करून मार्केटिंग
खा. सुळे यांनी या वेळी राज्य सरकारळा लक्ष्य करीत सध्या भाजपा सरकार हे केवळ भाषणे करून मार्केटिंग करीत आहे. प्रत्यक्षात शेतकर्यांस न्याय मिळत नाही, असे सांगितले. पेट्रोल,डीझेलच्या दरवाढी बाबत खा. सुळे यांनी भाजपची खिल्ली उडवली. पूर्वी इंधन दरवाढ झाली की एक मावशी येत होती. आता मी ती मावशी शोधत आहे,असे त्या म्हणल्या.
अन्यथा पंढरपूर ते मुंबई आंदोलन
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे, ही मागणी आहे. यामध्ये मुख्यमंत्री फास्टट्रॅक खटला चालविणार होते. मात्र वर्ष उलटूनही कोपर्डीचा खटला सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि खला तीन महिन्यांमध्ये निकाली काढावा. अन्यथा, पंढरपुरातूनच मुंबईपर्यत जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.