शिवसेनेचे उपगटनेते अनंत जोशी यांच्याविरुध्द गुन्हा

0

जळगाव – महानगरपालिकेच्या पंधराव्या मजल्यावरील नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबुन ठेवले तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपगटनेते अनंत उर्फ बंटी जोशी यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपाच्या १५ व्या मजल्यावरील नगररचना विभागात सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे उपगटनेते तथा नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी ‘आमचे माणसांचे काम तुमच्या विभागात होत नाही, मी तुमच्या ऑफिसला कुलूप लावणार आहे, तुम्ही कार्यालयाच्या आत थांबता की, बाहेर जाताय असे नगररचना विभागातील रचना सहाय्यक सुहास चौधरी यांना सांगितले. त्यानंतर सुहास चौधरी व मनपा कर्मचारी शेख मोहम्मद यांचे सहकारी काम करीत असतांना त्यांना बाहेर जाता येऊ नये तसेच कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाच्या आत कामकाजासाठी येता येऊ नये या उद्देशाने कार्यालयास बाहेरुन कुलूप लावून सरकारी कामात अडथळा आणून अटकाव केला व सुहास चौधरी, शेख मोहम्मद अशा दोघांना कार्यालयात डांबून ठेवले, अशी फिर्याद रचना सहाय्यक सुहास चौधरी यांनी शहर पोलिस स्टेशनला दिली आहे. चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अनंत उर्फ बंटी जोशी यांच्या विरुध्द दोन कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद देण्याच कर्मचाऱ्यांची ‘ना’
शिवसेनेचे बंटी जोशी यांनी नगररचना कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या आदेशाने नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुपारी बंटी जोशी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस स्टेशनला गेले होते. परंतु फोन आल्यामुळे कर्मचारी गुन्हा दाखल न करता माघारी परत गेले. त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांना फोन आल्याने अधिकारी कर्मचारी दाखल करण्याकरीता शहर पोलीस स्टेशनला गेले. मात्र, फिर्याद देण्यासाठी कोणीही धजावत नसल्याने बराच वेळ गुन्हा दाखल झाला नाही, अखेर रात्री ७ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय दबावातून गुन्हा दाखल
महापौर निवडीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या उपगटनेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते सुनील महाजन यांनी केला आहे. तसेच भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून शिवसेनेची जादु सुरु झाल्यामुळे दबाव निर्माण करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सांगितले. नागरिकांच्या प्रश्नासाठी जोशी यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले होते, मात्र, गुन्हा दाखल करुन लोकशाहीची मुस्कटदाबी केली जात असल्याचे प्रशांत नाईक म्हणाले.