शिवसेनेचे दबावतंत्र सुरु!

0

सत्तेतून बाहेर पडण्याची सेना आमदार, खासदारांची तयारी

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला खुलेआम आव्हान देत, भाजपप्रवेशाची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे शिवसनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम देत सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व सर्व प्रमुख नेत्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाली, या बैठकीत सर्वांनीच सत्तेतून बाहेर पडण्यास तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शिवसनेना केव्हाही सत्तेतून व एनडीएतून बाहेर पडू शकते असे वातावरण सध्या असले तरी शिवसेनेचा हा इशारा म्हणजे राणेंच्या प्रवेशाला विरोध तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या होत असलेल्या विस्तारात अधिक मंत्रिपदे मिळावी, यासाठी सुरू असलेली ही खेळी असल्याचा तर्कही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांवर रोष..
औरंगाबाद येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होईल, असे सुतोवाच केले होते. त्यातच राणेंनीही भाजपप्रवेशासाठी हालचाली वाढवत थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच टार्गेट केले. यासर्व हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मातोश्रीवर सोमवारी दुपारी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीलाही महत्वप्राप्त झाले होते. या बैठकीत शिवसेना आमदारांनी फडणवीस सरकारविरोधात रोष व्यक्त केला. भाजपसोबत राहण्यात आता हित नाही. तुम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आमदार, खासदारांनी ठाकरे यांना सांगितले. तुमचे म्हणणे मी मुख्यमंत्र्यांच्या एकदा आणि शेवटचे कानावर घालतो, नंतर आपण आपला निर्णय घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहे.

तर सत्तेत राहायचे कशाला?
मातोश्रीवरील या बैठकीनंतर खासदार संजय राऊत म्हणाले, आमदार-खासदारांनी आपली मते पक्षप्रमुखांसमोर मांडली. सत्तेत असूनही आमची कामे होणार नसतील तर सत्तेत राहायचे कशाला? असे मत सर्वांनी मांडले. मोदी सरकारसह राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला आहे. पेट्रोलच्या किंमती व इतर बाबींमुळे सरकारविरोधात जनमत तयार होऊ लागले असून, या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये असे पक्षाचे खासदार, आमदार व नेत्यांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आपला मार्ग निवडेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तर पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, आमदारांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे मत मांडले असून पक्षप्रमुख याबाबत अंतिम भूमिका मांडतील.

शिवसेनेच्या मंत्र्यांची हतबलता
मातोश्रीवर दोन तास चाललेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत चर्चा झाली. संबंधित मंत्र्यांना कार्याचा, कामाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अनेक आमदारांच्या तक्रारी होत्या. ग्रामीण भागातील काही आमदारांनी मंत्री आमचे काहीही काम करत नाहीत अशी टीका केली होती. मुंबईतील आमदार तुकाराम काते यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यावर तोफ डागली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, मंत्र्यांनी आपली हतबलता बैठकीत मांडली. आम्हाला पाच रूपयांचाही निधी दिला जात नाही. तर आम्ही कामे कशी करावीत आणि कोणाला निधी, फंड वितरित कसा आणि कोठून करणार, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. या बैठकीत सर्व नेत्यांना मोबाईल, लॅपटॉप नेण्यास मज्जाव केला होता. त्यांच्या स्वीय सहायकांनाही आत सोडण्यात आले नाही. बैठकीतील चर्चा व माहिती होऊ बाहेर जाऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईलबंदी करण्यात आली होती.