शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल यांनी पळवला राजदंड

0

अर्धा तास सभा तहकुब; पटेल यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांचे सभेपूरते निलंबन

जळगाव– वादग्रस्त नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरुवारी जळगाव महापालिकेच्या महासभेत उमटले. सभेच्या सुरुवातीला भाजपच्या वतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी या विधेयकाला पाठींबा देणार्‍यांचा धिक्कार असो अशा शब्दात निषेध करत राजदंड पळविला.त्यामुळे महासभेत चांगलाच गदारोळ झाला.दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी राजदंड पळविणारे इब्राहिम पटेल यांच्यासह त्यांना मदत करणारे एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांना निलंबित करण्याची भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार मागणी केली.अखेर महापौर सीमा भोळे यांनी अर्ध्यातासासाठी सभा तहकुब करत दोन्ही नगरसेवकांना सभेपूरते निलंबित केले.

महापालिकेची महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्यात येत होते. यावेळी भाजपच्या वतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरून उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत ’नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणार्‍यांचा निषेध असो’, ’भारतीय संविधानाचा विजय असो’, ’हिंदू-मुस्लिम भाई भाई’, अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

सभागृहात तणाव

इब्राहिम पटेल राजदंड पळवून नेत असतांना भाजपचे नगरसेवक भगत बालाणी,ललित कोल्हे,कैलास सोनवणे,विशाल त्रिपाटी,सुनिल खडके,जितेंद्र मराठे ,चेतन सनकत,सचिन पाटील,कुलभूषण पाटील,राजेंद्र घुगे-पाटील,मुकुंदा सोनवणे यांनी त्यांच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा,सुनिल महाजन,विष्णू भंगाळे,अमर जैन,प्रशांत नाईक,बंटी जोशी,नितीन बरडे,गणेश सोनवणे यांनी अनुचित प्रकार होवू नये म्हणून प्रतिकार केला.त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. इब्राहिम पटेल यांच्या हातातून भाजपच्या नगरसेवकांनी राजदंड हिसकावून ’वंदे मातरम’, ’भारत माता की जय’, अशा घोषणा देत राजदंड व्यासपीठावर नेवून ठेवला.दरम्यान,या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी इब्राहिम पटेल आणि एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांना निलंबित करण्याची मागणी केली. अखेर महापौर सीमा भोळे यांनी अर्धा तासाच्या कालावधीसाठी सभा तहकूब केली.

इब्राहिम पटेल,रियाज बागवान सभागृहातून बाहेर

सभा तहकूब झाल्यानंतर अर्धा तासांच्या कालावधीनंतर सभा पुन्हा सुरू झाली. यावेळी मात्र, सेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल, तसेच त्यांच्या कृतीला पाठींबा देणारे एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांना देखील महापौरांनी सभागृहातून बाहेर काढले. यावेळी महापौर सीमा भोळे यांनी इब्राहिम पटेल यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांचे सभेपूरते निलंबन केले.

कैलास सोनवणेंनी मांडला राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव

महासभा तहकुब झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पून्हा सभेला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी बाक वाजवून प्रतिसाद देत ’माफी मांगो,माफी मांगो,राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा दिल्या.तसेच इब्राहिम पटेल,रियाज बागवान यांनी चुकीच्या पध्दतीने गोंधळ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी कैलास सोनवणे यांनी मागणी केली.

महापौर,उपमहापौर संतप्त

महासभा सुरु असताना इब्राहिम पटेल यांनी अचानकपणे व्यासपीठावर जावून राजदंड पळविला.त्यामुळे महापौर सीमा भोळे,उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. शांत,संयमी असलेल्या महापौर सीमा भोळे यांनी तर इब्राहिम पटेल आणि रियाज बागवान यांना राजदंड का पळवला असे म्हणत सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश देत सभा अर्ध्यातासाठी तहकुब केली.

मनपाच्या निधातून रस्त्यांची कामे करावी-नितीन लढ्ढा

शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या अन्य नियोजित कामे कमी करून अत्यावश्यक रस्ते दुरुस्ती करण्याची नितीन लढ्ढा यांनी सूचना मांडली. काव्यरत्नावली चौक ते रामानंद नगर पर्यंतचा रस्त्या दुरुस्तीसाठी ठराव करावा अशी मागणी केल्यावर शिवसेनेच्या नविन सरकारने शंभर कोटीच्या कामांना स्थगिती दिली आहे ते उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याचा सर्वपक्षीय ठराव करावा अशी उपसूचना भाजपच्या नगरसेवकांनी केली.
दरम्यान,प्रशासनाने बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांकडून शहरातील सर्व रस्त्यातील खडी, दगड उचलून स्वच्छ करण्याचे काम करावे अशी मागणी शिवसेना गटनेते बंटी जोशी यांनी केली. शहरातील खराब रस्त्यांच्याबाबत चर्चा सुरू असतांना भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी े अमृत योजना, स्वच्छता, एलईडी पथदिवे याकडे लक्ष वेधले. यावर विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांनी सत्ताधार्‍यांना त्यांचे सदस्य हे घरचा आहेर देत असल्याचेे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

अंतिम नोटीस मक्तेदारा देवू : आयुक्त

सफाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे भूमिका सभागृहात मांडली.ते म्हणाले, की सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवरून वॉटरग्रेसचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून येते. त्याबाबत मक्तेदाला वारंवार नोटीसा, दंडात्मक कारवाई सुध्दा केली आहे. येत्या एक-दोन दिवसात मक्तेदाला कामाचा दर्जा सुधारण्याची अंतिम नोटीस दिली जाणार आहे. तसेच स्वच्छतेची पर्यायी व्यवस्था चारही प्रभाग समितीनुसार तयार करण्याची तयारी देखील महापालिका प्रशासनाकडून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एलईडीसाठी पोलचे लवकरच सर्वेक्षण

शहरात एलईडी पथदिव्यांचा कामाबाबत शिवसेना सदस्य विष्णू भंगाळे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर उपायुक्त मिनीनाथ दंडवतेंनी सभागृहात माहिती देतांना म्हणाले, की ईएसएल कंपनीकडून सुधारित आराखडा तयार केला जावून लवकरच एलईडी पथदिवे बसविण्याचे काम केले आहे. अठरा हजार पोलचे सर्वेक्षण करायचे असून त्यापैकी आतापर्यंत साडेपाच हजार पोलचे सर्वेक्षण झाले असल्याची ते म्हणाले.