अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा
मुंबई : शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे भाजपमध्ये सहभागी होतील, असा खळबळजनक दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना भाजपसोबत सत्तेत असलेला पाठिंबा काढणार अशी चर्चा होती; मात्र जरी शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस यांना काहीच फरक पडणार नाही. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेदेखील काही आमदार संपर्कात आहेत, त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा रवी राणा यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना केला.
प्रत्येक जिल्ह्यात पवारांचा नागरी सत्कार
मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांचादेखील पाठिंबा असल्याचे सांगून आ. राणा म्हणाले, शरद पवार यांचा नागरी सत्कार प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ठिकाणी सत्कार होईल, तिकडे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही राणा यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नसल्याचे सांगत अनेक आमदार हे या मेळाव्याला दांडी मारणार असल्याचे राणा म्हणाले. आम्ही अपक्ष 6 आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील. त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही, असेहीे ते म्हणाले. दरम्यान, याबाबत शिवसेना प्रवक्त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.