शिवसेनेच्या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार?

0

मुंबई । 19 आमदारांच्या निलंबन प्रकरणावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवले ते मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या मंत्र्यांचा लो परफॉर्मन्स दिसला आणि मुंबईतील महत्त्वाचा असलेला बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरून ज्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली, अशा मंत्र्यांना आता मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्र्यांच्या या वागणुकीवरून शिवसेनेच्या आमदारांचाच नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. याची गंभीर दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले.

निलंबनाच्या ठरावाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांना कल्पना देण्यात आली हेाती
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. सुरुवातीला शिवसेनेची त्यांना साथ मिळाली. त्यानंतर सेनेची नरमाईची भूमिका झाली. गेल्या 12 दिवसांपासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रश्‍न अधिवेशनात गाजत आहे. वित्त व विनियोजन विधेयक मंजूर करताना शिवसेना व विरोधक एकत्र आल्यास कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपची कोंडी होऊ शकते. या कारणावरून सत्ताधार्‍यांनी 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. तात्पुरते निलंबनाची ही कारवाई असल्याचे बोलले जाते. या निलंबनाच्या ठरावाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांना कल्पना देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुखांनाच अंधारात ठेवल्याचे समोर आले आहे. पक्षप्रमुखांनी याची दखल घेतल्यानंतर, शिवसेनेने निलंबनास विरोध असल्याचे जाहीर करीत ती मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेविषयी नाराजी
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मुंबईतील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ओळखला जातो. मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय रेल्वे सेवेकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पावर हजारो कोटी रुपये खर्च केले जात असल्याने या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेने विरोध पहिल्यापासूनच असतानाच शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी बुलेट ट्रेनबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे शिवसेनेचा विरोध असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा मंत्री प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका दर्शवत असल्याने शिवसेनेची डबल भूमिका स्पष्ट होत आहे. परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

सत्ता राखण्यात फक्त एकनाथ शिंदे यांना यश
तसेच काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर केला. शिवसेनेचे मंत्री मात्र सत्तेचा वापर करण्यात अपयशी ठरले. ठाणे महापालिकेची सत्ता राखण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. मात्र, इतर मंत्र्यांचा परफॉर्म्स इतका चांगला नाही. त्यामुळे इतर मंत्र्यांविषयी खुद्द पक्षप्रमुखही नाराज आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामे होत नसल्याच्या तक्रारी खुद्द आमदार आणि शिवसैनिकांनी केल्या होत्या. मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा शिवसेनेला फटका सहन करावा लागत आहे. याची दखल खुद्द पक्षप्रमुखांनी घेतली असल्याने अधिवेशनानंतर अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार, असे बोलले जात आहे.