मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासारख्या मोठ्या माणसाचे नाव विचारणा न करता राष्ट्रपतिपदासारख्या सर्वोच्च पदासाठी थेट सुचवण्याचा अतिउत्साह शिवसेनेला तोंडावर आपटवणारा ठरला आहे. खुद्द मोहन भागवत यांनी अशा प्रस्तावाच्या बातम्या म्हणजे मनोरंजन वार्ता असल्याची खिल्ली उडवली. तसेच आपण संघाचे स्वयंसेवक असून, यापुढेही स्वयंसेवक असणार हे निग्रहाने सांगत राष्ट्रपतिपदाच्या स्पर्धेत नसल्याचेही स्पष्ट केले. संघ कार्य हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
खा. राऊत यांनी टाकला होता खडा!
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतिपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाचा प्रस्ताव चर्चेत आणला होता. हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रपतिपदी निवड आवश्यक असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले होते. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने हिंदुत्ववादी नेता पंतप्रधान, उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांच्यासारखा हिंदुत्ववादी नेत्याची निवड झाल्यानंतर आता राष्ट्रपतिपदासाठी मोहन भागवत हेच योग्य असल्याचे राऊत म्हणाले होते. त्या प्रस्तावामुळे सुरू झालेल्या चर्चेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्णविराम दिला. राष्ट्रपतिपद मिळाले तरी मी ते स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करून डॉ. भागवत यांनी आपले नाव राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून काढूनच घेतले. मी संघात येताना राजकारणाचे सर्व दरवाजे बंद केले होते, त्यामुळे राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
राष्ट्रपतिपदासाठी मोदी सरकारची मोर्चेबांधणी
उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ जुलै 2017 मध्ये संपणार आहे. त्यामुळे या मानाच्या सिंहासनावर कोण बसणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मोदी सरकारनेही त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे कळते. स्वाभाविकच, अनेक मान्यवरांची नावे या पदासाठी चर्चेत आली आहेत. त्यात मोहन भागवत यांच्या नावाची जोरदार हवा होती. राष्ट्रपतिपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. त्याकडे मनोरंजन म्हणून बघा आणि सोडून द्या. ही चर्चा हवेत विरेल, असे म्हणत भागवतांनी हा विषय निकाली काढला.