शिवसेनेच्या असहकार्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका शक्य

0

मुंबई : युती तुटल्यापासून व नंतर सत्तेत सहभागी झाल्यावरही भाजपाविरोधात शिवसेनेने छेडलेले युद्ध संपत नसल्याने भाजपा़चे श्रेष्ठी वैतागलेले आहेत. त्यामुळेच सतत ही कटकट ऐकत बसण्यापेक्षा मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन येत्या वर्षात महाराष्ट्रात बहूमत मिळवण्यासाठी मध्यावधी निवडणूकीचा जुगार खेळण्याचा विचार भाजपाश्रेष्ठींमध्ये बळावत आहे. प्रामुख्याने मुंबईत सेनेला बरोबरीत आणल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास बळावला आहे. उलट सेनेने विधानसभेत मिळवलेल्या शुभेच्छा मध्यंतरीच्या दोन वर्षात गमावल्याचे स्थानिक निवडणूकातून समोर आलेले आहे. म्हणूनच थेट विधानसभा बरखास्त करून मध्यावधी घेण्याचा विचार पुढे येतो आहे. याला आणखी एक कारण आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत अनेक आमदार नाराज असून, त्यापैकी अनेकजण भाजपात यायला उत्सुक आहेत. कॉग्रेस व राष्ट्रवादीतही अनेक आमदार त्या़च मनस्थितीत आहेत. त्याचा दुहेरी लाभ भाजपाला मिळू शकतो, असे पक्षाच्या रणनितीकारांचे मत आहे. एकीकडे विद्यमान आमदार उमेदवार म्हणून भाजपाला मिळतील आणि त्याच कारणास्तव सेना व दोन्ही कॉग्रेसला पर्यायी उमेदवार नसल्याने तारांबळ उडेल. राष्ट्रपती निवडणूक जुलै महिन्यात असून, तोपर्यंत शिवसेनेची कटकट संपली नाही तर भाजपा मध्यावधीचे धाडसी पाऊल उचलू शकेल, असे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले.

मध्यावधी निवडणूक झाल्यास कोकण व मुंबई वगळता अन्य भागात सेनेला जागा जिंकता येणार नाहीत आणि नकारात्मक भूमिकेला सध्या देशभर मतदार प्रतिकुल असल्यानेच भाजपाला त्याचा इथेही लाभ मिळू शकेल. खेरीज यावेळी देवेंद्र फ़डणवीस हा विश्वसनीय चेहराही नेतेपदासाठी लोकांना आवडलेला असल्याने, भाजपा सहज बहूमताचा पल्ला पार करू शकेल असे या जाणत्यांचे मत बनत चालले आहे. अन्य पक्षातून आलेले किमान ४०-५० आमदार नव्याने भाजपाचे उमेदवार असतील असे म्हटले जात आहे.