मुंबई । दुष्काळग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर विधानसभेत आमदारांच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अडचणीत आणण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून आखण्यात आली होती. मात्र शिवसंपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील दौर्याला 40 पैकी तब्बल 27 आमदारांनी अनुपस्थिती लावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी ठाकरे यांनी 40 आमदारांना मराठवाड्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांची पाहणी करण्याच्या मोहिमेवर जाण्याचे आदेश दिले, जोडीला आजी-माजी नगरसेवक, संपर्कप्रमुखांची फौजही दिली. पण 40 पैकी 27 आमदार तेथे पोहोचलेच नाहीत. या प्रकारामुळे खवळलेल्या उद्धव ठाकरे यांनी गैरहजर आमदारांची चांगलीच कानउघडणी केली. मात्र तरीही आमदार दाद देत नाहीत असे दिसल्यावर त्यांना शिवसेना भवनावर हजर राहण्याचे फर्मान काढले होते.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. विक्रीविना तूर पडून आहे, हाती पैसे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संधीचा फायदा सावकार घेऊ लागले आहेत. शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या, तूर-सोयाबिनचा प्रश्न, दुष्काळ स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यातील प्रश्न जाणून ते विधानसभेत मांडता यावेत यासाठी आमदारांना या मोहिमेवर पाठवण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 40 आमदारांची निवडही करण्यात आली. या आमदारांच्या मदतीसाठी मुंबई-ठाण्यातील आजी-माजी नगरसेवक आणि संबंधित जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखांना तेथे जाण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र 6-7 मे रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्यासाठी 40 पैकी 27 आमदार गेलेच नाहीत. उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून आजी-माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये दाखल झाले. स्थानिक नागरिक, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आदींच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी आपले अहवाल तयार केले आणि ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर केले.
हे अहवाल हाती पडताच 27 आमदार आणि काही संपर्कप्रमुख मराठवाड्याच्या दौर्यावर गेलेच नाहीत हे उद्धव ठाकरे यांना समजले आणि त्यांनी या सर्वाशी संपर्क साधून त्यांची कानउघडणी केली. तसेच दौर्यावर न गेलेल्या आमदारांना तात्काळ खुलासा देण्याचे फर्मानही शिवसेना भवनातून सोडण्यात आले. मात्र मातोश्रीवर आपले वजन असल्यामुळे 27 पैकी काही आमदारांनी खुलासाही देणे टाळले. नेमून दिलेल्या मोहिमेवर आमदार जात नाहीत आणि त्यानंतर आदेश देऊनही लेखी खुलासाही करत नाहीत या प्रकारामुळे उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. शिवसेनेचा दुसर्या टप्प्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा शनिवार, 13 मे रोजी सुरू होत आहे. आमदारांच्या अनुपस्थितीमुळे दौर्यात गोंधळ होऊ नये म्हणून दांडीबहाद्दर आमदारांना शुक्रवारी शिवसेना भवनावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. यामुळे आता पक्षाची शिस्त मोडणार्या या आमदारांवर मोठी आफत कोसळण्याची चिन्हे आहेत.