जळगाव। महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक रिंगणातील भाजप व अपक्ष अशा दोघं उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार तथा माजी महापौर आशाताई कोल्हे या बिनविरोध निवडून आल्या. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 अ साठी बुधवार 19 एप्रिल रोजी मतदान होणार होते. या निवडणुकीसाठी एकुण 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात मनीषा शैलेंद्र ठाकूर यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेचा मुद्दा पुढे आल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला होता. तर अपात्र ठरलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका मंगला चौधरी यांची धाकटी जाऊ अश्विनी चेतन चौधरी यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपच्या वतीने अनिता शंकर चौधरी तर शिवसेनेच्या वतीने माजी महापौर आशा दिलीप कोल्हे यांचा तसेच अपक्ष उमेदवार सरला मच्छिंद्र चौधरी यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याने या पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र 7 एप्रिल रोजी माघारीच्या अंतिम दिवशी भाजपाच्या चौधरी व अपक्ष उमेदवार चौधरींनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार तथा माजी महापौर आशाताई कोल्हे या बिनविरोध निवडून आल्या.
शिवसेनेचे संख्याबळ पोहचले दोनवर
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी खान्देश विकास आघाडी व शिवसेनेने केलेली खेळी अखेर यशस्वी झाल्याने शिवसेनेच्या उमेदवार आशाताई कोल्हे बिनविरोध निवडून आल्या. या पोटनिवडणुकीत मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता आधीच माघार घेतली होती. तर भाजप व सेनेत राज्यात सुरू असलेले संघर्ष बघता या निवडणुकीत भाजप विरूध्द सेना अशीच सरळ लढत होईल, असे चित्र शेवटच्या दिवसापर्यंत भाजप उमेदवाराने माघार न घेतल्याने दिसून येत होते. मात्र, भाजपाच्या अनिता चौधरी व अपक्ष उमेदवार सरला चौधरी या दोघींनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडून निवडणूक टळली. मनसे व खाविआने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने तसेच राष्ट्रवादीने उमेदवारच न दिल्याने भाजपाच्या विरोधात चार पक्षांची ताकद या निवडणुकीत लागलेली दिसून आली. बिनविरोध निवडून आलेल्या शिवसेनेच्या उमेदवार आशाताई कोल्हे या माजी महापौर असून उपमहापौर व मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्या काकू तर रा.काँ.चे महानगराध्यक्ष परेश कोल्हे यांच्या मातोश्री आहेत. या विजयाने मनपात शिवसेनेचे संख्याबळ आता एक वरून दोन असे झाले आहे.
फटाक्यांची आतिषबाजी करून सत्ताधार्यांचा जल्लोष
पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तथा माजी महापौर आशाताई कोल्हे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच सत्ताधाजयांनी मनपाच्या प्रशासकिय इमारतीबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, मनसे नगरसेवक बंटी जोशी, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह सर्मथक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.