शिवसेनेच्या कामचुकार मंत्र्यांना लवकरच डच्चू!

0

मुंबई : शिवसेनेच्या कामचुकार मंत्र्यांबाबत पक्षाच्याच आमदारांनी व्यक्त केलेल्या नाराजीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ’थोडी कळ सोसा,’ असा सबुरीचा सल्ला देत उद्धव यांनी शिवसेनेत पक्षांतर्गत मोठे फेरबदल करण्याचे संकेतच या आमदारांना दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या काही कामचुकार मंत्र्यांना डच्चू मिळणार असून, काही राज्यमंत्र्यांना बढती देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. ठाकरे यांनी सेना आमदारांशी फोनवरून चर्चा करून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावादेखील घेतला असल्याचे सूत्र म्हणाले.

नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार!
शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सेना आमदारांबाबत नाराजी आहे. सरकारमधील भूमिकेबाबत सेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये मतमतांतर वारंवार दिसून आले. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या आमदारांनी एका बैठकीत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. जनतेकडून कर्जमाफीबाबत विचारणा होत आहे. जनतेने आमदारांचे कपडे काढणेच बाकी राहिले आहे, अशा शेलक्या शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांबाबत संताप व्यक्त केला होता. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी पक्षबांधणी, केंद्रातील भूमिका, मतदारसंघातील कामे आणि पुढच्या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी याबाबत चर्चा झाली होती. दरम्यान, पक्षप्रमुखांनी मंत्रिमंडळातील सेनेचे चेहरे बदलण्याचा निर्णय घेतल्यास कोणत्या नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पक्षसंघटनेतही करणार महत्वपूर्ण बदल
या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नाराज आमदारांशी फोनवर संपर्क साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा आढावाही त्यांनी आमदारांकडून जाणून घेतल्याचे समजते. यावेळी त्यांनी आमदारांना ’फक्त काही दिवसापुरती कळ सोसा,’ असे सांगितल्याचे समजते. उद्धव यांच्या या सबुरीच्या सल्ल्याचे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. काही मंत्र्यांना पदावरून हटवून नाराज आमदारांना मंत्रिपदे देण्याचा आणि इतर नाराजांना पक्षात मोठ्या जबाबदार्‍या देण्याचा विचार शिवसेनेत सुरू असून, येत्या काही दिवसात हे फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळातील फेरबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचेही शिवसेनेत घटत असल्याचे सांगण्यात येते.