शिवसेनेच्या गळाला लागले ३ नगरसेवक

0

मुंबई : मुंबई महापालिकेत मर्यादित यश मिळाल्यानंतरही सत्ता हाती घेण्याचा दावा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी चार वाजता शिवसेना भवनावर निवडून आलेले नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या नगरसेवकांची मते जाणून घेतील. परस्परांवर जहरी टीका केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीबरोबर पुन्हा सत्तेत जायचे नाही, असा शिवसैनिकांचा सूर आहे. अशा स्थितीत कोणता निर्णय घ्यायचा, याची चाचपणी यावेळी केली जाणार असल्याचे कळते. येत्या नऊ मार्चला मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेने आता जुळवाजुळव सुरू केली असून शुक्रवारी तीन नगरसेवकांचे समर्थन मिळवण्यात सेनेला यश आले. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक १२३ मधून निवडून आलेल्या बंडखोर उमेदवार स्नेहल मोरे यांनी शुक्रवारी बंडखोर विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची, त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी रात्री मालाडच्या प्रभाग क्रमांक ४१ मधील अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे यांना `मातोश्री’वर नेले. तेथे शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शुक्रवारीच अंधेरीतील प्रभाग क्रमांक ६२ मधील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांनीही ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपले समर्थन जाहीर केले. त्यामुळे ८४ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळ आता ८७ वर पोहोचले आहे.