मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आतापासून सर्वेक्षण सुरु
पुणे : राज्य विधानसभेसाठी 2014 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 122 जागांवर मजल मारता आली. तर शिवसेनेला दुसर्या क्रमांकाच्या 63 जागा मिळाल्या. मोदी लाट असतानाही पक्षाला बहुमतापासून फार थोड्या फरकाने दूर रहावे लागल्याबद्दल आतापासून भाजपमध्ये रणनीती आखली जात आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत 175 जागांचे टार्गेट भाजपने ठेवले असून, त्यासाठी आतापासून मतदारसंघानिहाय सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या तर भाजपने शिवसेनेच्या जागांना लक्ष्य करत, तेथे आपल्या जागा कशा जिंकता येतील, यासाठी आतापासून राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रच घेऊन केंद्र व राज्यात संपूर्ण बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपची निवडणूक रणनीती तयार केली जात असल्याची माहिती याच पक्षाच्या पुणेस्थित वरिष्ठ नेतृत्वाने दिली.
ठरावीक 40 जागांवर भाजपचा डोळा!
विधानसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात. जेव्हा की या निवडणुकीत भाजप हा स्वबळावर रणांगणात उतरले होते. त्या खालोखाल शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळालेल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडीला तीन, एमआयएमला दोन तर भारिप-बहुजन महासंघाला एक जागा मिळालेली आहे. थोड्या जागांअभावी बहुमत हुकल्याचे शल्य सद्या भाजपला सतावते आहे. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत 175+ जागांचे मिशन भाजपच्या नेतृत्वाने हाती घेतले आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच मतदारसंघात खास सर्वेक्षण केले जात असून, त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपविला जात आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना व काँग्रेसच्या जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलेले आहे. निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून या भागातील 40 जागांवर भाजपचा डोळा असून, तेथे शिवसेना व काँग्रेस आमदारांच्या विरोधकाला ताकद देऊन भाजप बळकट करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे.
खा. काकडेंवर अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी
भाजपला ज्या 40 जागा विरोधकांकडून खेचून घ्यायच्या आहेत, त्या जागांची सर्वस्वी जबाबदारी पुण्याचे खासदार संजय काकडे यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. शिवसेना व काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्यादेखील काही जागांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत विश्वासपूर्वक ही जबाबदारी खा. काकडे यांच्यावर सोपविलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या ठळक जागांवर भाजपचे लक्ष आहे, त्यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघ, सांगली मतदारसंघ, आणि बारामती मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे. भोरमध्ये सद्या काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, सांगलीतून काँग्रेसनेते तथा माजी मंत्री पतंगराव कदम, आणि बारामतीत तर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे. तरीही या जागा जिंकण्याची जबाबदारी खा. काकडे यांच्यावर सोपविण्यात आलेली असल्याचे विश्वासनीय सूत्राने सांगितले. 175 जागांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी स्थानिक भागातील बलाढ्य राजकीय नेते पक्षात घेणे, राजकीय मोहीम आखणे, विकासकामे मार्गी लावणे, विद्यमान आमदाराच्या राजकीय विरोधकांना ताकद देणे, तसेच सोशल मीडियाचा प्रभावशाली वापर करणे आदी प्रकारचे राजकीय उपक्रम भाजपकडून हाती घेण्यात आले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीची मात्र टीका
ज्या भागात भाजप कमकुवत आहे, त्या भागात मंत्री व पक्षाच्या नेत्यांच्या सभा, दौरे आदी कार्यक्रम आखण्यात आले असून, भाजप नेत्यांनाही त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. जोरदार प्रचारमोहीम राबविण्यासाठी पक्षाने 20 व्हॅनदेखील खरेदी केलेल्या आहेत. त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. या व्हॅनद्वारे राज्य व केंद्र सरकारने केलेल्या विविध लोकोपयोगी योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. भाजपच्या रणनीतीबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नुकतीच टीकाही केली होती. सत्तेत राहण्यासाठी भाजप अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन षडयंत्र रचत असल्याचा आरोप खा. चव्हाण यांनी केला होता. तसेच, दुसर्या पक्षाची माणसे फोडून पक्ष वाढविण्याचा भाजपचा प्रकार किळसवाणा असल्याचेही खा. चव्हाण म्हणाले होते. नोटाबंदी, जीएसटी व वाढत्या महागाईने जनमाणसांत सरकारविरोधात रोष असून, भाजपने कितीही रणनीती आखली तरी त्यांना यश मिळणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी हाणला आहे.