नंदुरबार- मराठा आंदोलकांना खुले आव्हान देणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी माफी मागितल्याने 9 ऑगस्टच्या बंद मधून नंदुरबार वगळण्यात आल्याची घोषणा नंदुरबार येथे दाखल झालेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. त्यामुळे साजरा होणारा जागतिक आदिवासी दिनावरचे सावट दूर झाले आहे. खासदार हिना गावीत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आदिवासींनी नंदुरबारला बंद पाळून तीव्रता दाखवली होती. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करतांना आदिवासी महासंघाचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी 9 ऑगस्ट रोजी मराठ्यांनी नंदुरबार बंद करून दाखवावे, असे आव्हान दिले होते. याची क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. त्याची दखल घेत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नंदुरबार बंद करूनच दाखवितो, असे प्रति आव्हान देत ऑव्हान स्वीकारले होते. याचा समाचार घेण्यासाठी आमदार जाधव आपल्या ताफ्यासह 8 ऑगस्ट रोजीच नंदुरबारला दाखल झाले होते त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.संजय पाटील यांनी मध्यस्थी करून एक बैठक घडवून आणली. आमश्या पाडवी यांनी माफी मागितल्याचे पत्र दाखविण्यात आले त्यामुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आदिवासी बांधवांची भावना लक्षात घेत गुरुवार, 9 ऑगस्टला नंदुरबार बंद राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या आदिवासी दिनावरील सावट दूर झाले असून पोलिसांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे, असे असले तरी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे.