शिवसेनेच्या बुडाखाली जाळ की ऊब?

0

आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र आहे, नाहीतर तो कधीच गुजर, मारवाड्यांचा झाला असता. आम्ही आहोत म्हणून इथं मराठी माणूस शिल्लक आहे, नाहीतर त्याला या व्यापार्‍यांनी कधीच पळवून लावलं असतं. आम्ही आहोत म्हणून इथं शांतता आहे, नाहीतर हा बिहार झाला असता. प्रत्येक मराठी माणूस, आमचा आहे आणि त्याच्यातील सळसळतं रक्त, हे आमचं आहे. त्याच्या नखाला धक्का तर लावून बघा, हात मुळापासून उखडून टाकू. कोणाची दादागिरी चालायची नाही इथं. आमचं राज्य आहे हे आणि आम्ही ते रक्त सांडून मिळविलेलं आहे. या वाघाच्या डरकाळीनं दिल्लीला हादरा बसतो. आम्हाला महालाची, गाद्यागिद्यार्र्ंची गरज नाही. आमचा लढा रस्त्यावरील सर्वसामान्य माणसासाठी असतो. त्याच्यावरील अन्याय आजवर कधीच खपवून घेतला नाही, घेत नाही आणि घेणारही नाही. म्हणूनच आम्ही आदेश सोडला, की महाराष्ट्र बंद होतो. ही धमक फक्त आणि फक्त शिवसेनेत आहे. बाकी कोणात असा दम नाही… संपले हे दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील…

लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. ‘2019मध्येही आम्हीच’ असे आजवर बोलणारा भारतीय जनता पक्षही तयारीला लागला आहे. तसेच या पक्षाचे नियंत्रण करणार्‍या विविध संघटनाही कामात गुंतल्या आहेत. दररोज बैठका, चर्चा, अधिवेशन, मीडिया सेल, बुथ… सुरूच आहे. कारण 2014 इतकी सोपी ही निवडणूक राहिलेली नाही. त्यावेळी वापरलेले सोशल मीडिया अस्त्र, आता त्यांच्यावर उलटू लागले आहे. तसेच इतके वर्ष बेशुद्धीत गेलेल्या विरोधी पक्षांना जागसुद्धा आपल्याच साडेचार वषार्र्ंच्या कारभाराने आणली असल्याची जाणीव भाजपला झाली आहे. महागाईच्या आगडोंबाने जनता होरपळली आहे.

अनेक चुकीच्या निर्णयांमुळे कोट्यवधी तरुण बेकारीच्या खाईत लोटले आहेत. लाखो उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले, अडचणीत आले. व्यावसायिक, नोकरदार हैराण झाले आहेत. त्यातच नरेंद्र मोदी हे खणखणीत वाजणारे नाणे राहिलेले नाही, असे आता फक्त लोकांनाच नव्हे तर भक्त आणि पक्षातील मंडळींनाही वाटू लागले आहे. म्हणूनच 2019 आरामात! अशा बेमूर्वतखोरपणातील अहं गळून पडला आहे. यातूनच नोटाबंदी, जीएसटी, दलितांवरील हल्ले, विचारवंतांचे खून, मुस्लिमांचे मुडदे, दंग्यांमधील आपल्याच संघटनांचा हात, टोकाचे हिंदुत्व… हे काही पाठ सोडायला तयार नाहीत. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढत जाणार्‍या भडक्याने पक्षाचीच आग आग होत आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जायचे कसे? जनतेला दिलासा द्यायचा कसा? अशा अनेक समस्यांच्या भोवर्‍यात भाजप आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधार्‍यांसाठी विणलेल्या जाळ्यात हा पक्ष स्वत:च अडकलेला आहे, तरीही संघटन असल्याने त्यांची निवडणूक तयारी जोरदार सुरू आहे.

काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षही कामाला लागले आहेत. सत्ताधार्‍यांवर अधिक आक्रमकपणे तुटून पडलेले आहेत. यातूनच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली. त्याला इतर 21 पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, यामधून अगदी अनपेक्षितरीत्या शिवसेनेने रणांगण सोडले, नव्हे; अक्षरश: पळ काढला. अरेरे! याबद्दल कीव करावी तितकी कमीच आहे. हा महाराष्ट्र, ही मुंबई आणि इथला मराठी माणूस फक्त आमचा, असा हक्क दाखवणारी शिवसेना पळून गेली. का? साठ वर्षांहून अधिक काळ प्रत्येक सत्ताधार्‍यांच्या बुडाखाली जाळ पेटवणार्‍या या संघटनेच्याच बुडाखाली भाजपने जाळ लावला असावा किंवा गेली साडेचार वर्षे मिळालेल्या सत्तेच्या उबेमुळे त्यांची मती फिरली असावी. वास्तविक राज्याच्या सत्तेचे ते अर्धे वाटेकरी आहेत. म्हणजे तेही सत्ताधारीच. तरीही जनता त्यांना जाब विचारत आहे, की तुम्ही बंदमधून का पळालात? खरे म्हणजे विरोधकांच्या बंदमध्ये सत्ताधार्‍यांचा सहभाग असू शकत नाही. तरीही त्यांना धारेवर धरायचे कारण म्हणजे सत्तेत असूनही, मंत्रिपदे मिळूनही हा पक्ष स्वत:ला सत्ताधारी समजतच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचा विरोधच असतो.

जाहीर सभा, मेळावे, बैठकांमध्ये अतिशय टोकाची भूमिका घेऊन त्वेषाने ते आरोप करत असतात. त्यांच्या तलवारीच्या वारातून नरेंद्र ते देवेंद्र कोणीही सुटलेले नाहीत. याचमुळे बंदमध्ये ते भाग घेतील, असे वाटले होते. मात्र, ते भागूबाई ठरले. मंत्रीपदाचे राजीनामे आम्ही खिशातच ठेवले आहेत, ही सुरुवातीला टाळ्याखाऊ घोषणा, नंतर नंतर मात्र हास्यापद ठरली. त्याच धर्तीवर ”आम्ही बंदमध्ये सहभागी झालो नाही, कारण देशामध्ये महागाईचा आगडोंब हा काही आज उसळलेला नाही. शिवसेनेने आधीपासूनच याविरोधात केंद्र आणि राज्यातील सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी फक्त कॅबिनेटमध्येच मुठी आवळलेल्या नाहीत तर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले आहे.

विरोधी पक्ष कालपर्यंत अजगरासारखा निपचित पडला होता. आता तो हालचाल करायला लागला आहे. आमची इच्छा आहे की विरोधी पक्षाने उद्या त्यांची ताकद दाखवावीच. लोकशाहीमध्ये सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनतेचा मजबूत आवाज म्हणून विरोधी पक्षाने उभे राहिले पाहिजे. हे आमचे मत आहे. उद्याच्या बंदकडे आम्ही तटस्थपणे पाहणार आहोत.” बंद सम्राट अगदी अगतिक झाला रे. शिवसेना दुय्यम झाली. भाजप वरचढ झाला. तेव्हाही केंद्रात भाजपचाच पंतप्रधान होता. पण शिवसेनेला फटकारण्याची हिंमत त्यावेळच्या भाजपला होत नव्हती आणि पंतप्रधानांनासुद्धा होत नव्हती. आज राज्याचा मुख्यमंत्री सेनेच्या जबड्यात हात घालू शकतो आहे, तशी भाषाही करू शकतो. हे असे का झाले? कारण शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी केली. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांचे पाणी आता जोखले आहे. सत्ता सोडणारी ही माणसं नाहीत. नुसती धमकावणारी आहेत. सरकारला रस्त्यावर आणू म्हणणारी आहेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यातच सत्तेवरून टोकाचे मतभेद आहेत. यामध्ये सत्तेचे पाणी किती मधुर आहे त्याची चटक शिवसेनेला लागली आहे. त्यामुळे दुय्यमच काय, तर तिय्यम दर्जा जरी भाजपने शिवसेनेला दिला, तरीही सत्तेतून बाहेर पडून भाजपला आव्हान देण्याची हिंमत आज शिवसेनेत नाही. याचाच परिपाक म्हणजे भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नाही आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. कारण जनता हे लक्षात ठेवणार आहे.