पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी जाहीर केले आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदारसंघावर शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. भाजपने इच्छुकांच्या यापूर्वीच मुलाखती घेतल्या असून चार जण इच्छुक आहेत. तर, शिवसेना इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती झाल्या. शिवसेनेने भोसरी मतदारसंघावर आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगितले आहे. त्यातच शिवसेनेची रणरागिणी, संभाव्य इच्छुक मानल्या जात असलेल्या शिरुरच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी माघार घेतली आहे. आपण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही. निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भोसरी विधानसभा मतदारसंघातून सुलभा उबाळे यांनी दोनवेळा निवडणूक लढविली आहे. 2009 मध्ये शिवसेना-भाजपची युती होती. युतीमध्ये भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. शिवसेनेकडून उबाळे यांनी नशीब आजमावले होते. परंतु, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणूका शिवसेना-भाजपने स्वतंत्र लढविल्या. दुसर्या वेळीही पक्षाने उबाळे यांना संधी दिली. मात्र, त्यांना पुन्हा पराभव सहन करावा लागला होता.