शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष !

0

१९ जूनला वर्धापन दिवस; पक्षप्रमुखांकडून काय घोषणा होणार?

मुंबई:- राज्यात सत्तेत सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचा ५२ वा वर्धापनदिन १९ जूनला गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे साजरा होत आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारमध्ये असूनही वारंवार सरकारला टार्गेट करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून या महत्वाच्या दिवशी काय भूमिका घेतली जाईल हे पाहणे औत्सुक्याचे असले.

वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेकडून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. सकाळी ११ वाजता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या शिबिराचे उद्घाटन करतील. सकाळी ११ ते १ या वेळेत शिवसेनेचे नेते मनोहर जोशी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर उपनेते विश्वनाथ नेरूरकर बुथवर नावे नोंदविण्याचे मार्गदर्शन करतील. आमदार राजेश क्षीरसागर आंदोलनाबाबत तर उपनेते नितीन बानुगडे पाटील भारतीय सीमेवरील सैनिक रक्षणासाठी की शहीद होण्यासाठी, या विषयावर भाषणे करतील. शेती आणि शेतकरी जगण्या-मरण्याच्या फेऱ्यात, या विषयावर चर्चासत्रही होणार आहे. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन आमदार शंभुराजे देसाई देसाई करणार आहेत. मिलींद मुरूगकर, धनंजय जाधव, प्रियांका जोशी, राजेश गंगमवार आणि गुलाबराव धारे यात सहभागी होणार आहेत.

दुपारी तीन ते पाच, या दुसऱ्या सत्रात उपनेते खासदार अरविंद सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे मार्गदर्शन होणार आहे. या सत्रात विकासाच्या नावाखालील अरिष्टे आणि महागाईचा विस्फोट, या दोन विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. पहिल्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे करणार असून राजेंद्र फातर्पेकर, नारायण पाटील आणि श्रीनिवास वनगा यात सहभागी होणार आहेत. दुसऱ्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन आमदार सुनील प्रभू करणार असून जानव्ही सावंत, ज्योती ठाकरे व विवेक वेलणकर यात सहभागी होणार आहेत. या सत्रानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.