मुंबई । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता मातोश्रीवर सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या पंधरा दिवसात चौथ्यांदा ही बैठक होत आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असून, पक्षांतर्गत फेरबदल होणार असल्याचेही बोलले जात आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. कर्जमुक्तीची मागणी शिवसेनेकडून लावून धरली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात हि मागणी सैल झाल्याने मंत्री विरुद्ध आमदार असेही चित्र अधिवेशनात दिसून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतरहि उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. शिवसेनेचे मंत्री मात्र, सत्तेचा वापर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे इतर मंत्रयाविषयी खुद्द पक्षप्रमुखही नाराज आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामे होत नसल्याच्या तक्रारी खुद्द आमदार आणि शिवसैनिकांनी केल्या होत्या. मंत्र्यांच्या अकार्यक्षमपणाचा शिवसेनेला फटका सहन करावा लागत आहे.