सोमवारी मातोश्रीवर होणार्या बैठकीत नव्या शहरप्रमुखांचे नाव जाहीर होणार
पिंपरी-चिंचवड : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख राहुल कलाटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने शिवसेनेकडून नवीन शहर प्रमुखाची निवड होणार आहे. यासंदर्भात उद्या, सोमवारी (दि. 25) मातोश्रीवर बैठक होणार आहे. या पदासाठी शहर महिला संघटक सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मारुती भापकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मातोश्रीवर शहरातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शहरप्रमुख पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
खासदार बारणे चिंचवडेंसाठी आग्रही
शहरप्रमुख पदासाठी सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, मारुती भापकर, गजानन चिंचवडे यांच्यासह माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांचेही नाव चर्चेत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी गजानन चिंचवडे यांच्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, जुन्या शिवसैनिकांचा चिंचवडे यांना विरोध आहे. चिंचवडे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच त्यांच्या मवाळ स्वरुपाच्या स्वभावामुळे शिवसेनेचा आक्रमकपणाचा सूर बदलेल, अशी भीती शिवसैनिकांना आहे. भगवान वाल्हेकर यांना यापूर्वी एकदा संधी देण्यात आली आहे. धनंजय आल्हाट महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळातून गायब झाले आहेत. तर मारुती भापकर हे मध्यंतरीच्या काळात शिवसेना सोडून गेले होते. त्यामुळे त्यांच्या नावांबाबत मतेमतांतरे असल्याचे समजते.
उबाळेंचे पारडे जड
सुलभा उबाळे यादेखील शहरप्रमुख पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. गजानन चिंचवडे यांना शहरप्रमुख करण्याऐवजी त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांना महिला संघटक तर सुलभा उबाळे यांना शहर प्रमुखपद दिले जावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून होत आहे. उबाळे या तीन टर्म नगरसेविका होत्या. त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूकदेखील लढवली आहे. राष्ट्रवादीने पुण्यात वंदना चव्हाण यांना संधी दिली. त्याच धर्तीवर शिवसेनेकडून पिंपरी-चिंचवडमध्ये उबाळे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास शहराच्या इतिहासात प्रथमच महिलेकडे शहर प्रमुखपद जाणार आहे.