शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजीवर चिंतन
‘पक्षासाठी काम करा’ सांगण्याची आली आदीकांवर वेळ
जळगाव – पक्षात कोणत्याही व्यक्तीसाठी काम करू नका, पक्षासाठी काम करा, गटबाजी टाळा असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीचे निरिक्षक अविनाश आदीक यांच्यावर आज आली. पक्ष निरिक्षक म्हणून अविनाश आदीकांचा दौरा हा गटबाजीमुळे डोकेदुखीचाच ठरला. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी पक्षातील गटबाजीवर बोट ठेवत निरिक्षकांनाच कोंडीत पकडल्याचे चित्र दिसून आले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही गटबाजी याच मुद्यावर चिंतन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अविनाश आदिक बुधवार पासून जिल्हा दौर्यावर आहेत. त्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महानगर आणि ग्रामीणचा आढावा घेतला. यावेळी बैठकीत आदीकांसमोरच मोठ्या प्रमाणावर गटबाजी दिसून आली. आदिक म्हणाले की, जाहीरपणे आम्ही आढावा कसा घेणार आहोत. आढावा ही पक्षांतर्गत बाब असते. तसेच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अजित पवार यायच्या आत हे सर्व दुरूस्त करा, असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी गुरूवारी सकाळी महानगरचा आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ते योगेश देसले, संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस नामदेव पाटील, विकास पवार, वाल्मिक पाटील उपस्थित होते.