शिवसेनेने झेडपीवर सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठींबा दिल्यास स्वागत

0

जळगाव । जिल्हा परिषद निवडणुक मागील महिन्यात पार पडली. आत सर्वांचे लक्ष अध्यक्ष निवडीकडे लागले आहे. येत्या मंगळवारी 21 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचे स्वरुप असल्याने संपुर्ण जिल्हा वासीयांचे याकडे लक्ष आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी 34 जागेची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 33 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाला एका जागेची आवश्यकता असल्याने ते कोणाच्या मदतीने सत्ता स्थापनावर याकडे लक्ष लागुन आहे. भाजपा जुना मित्र पक्ष शिवसेनेची मदत घेते की इतर पक्षांमध्ये फुट पाडुन सत्ता स्थापन करते हे येणारा काळच सांगेल. शिवसेना हा भाजपाचा राज्यात मित्र पक्ष असल्याने पुर्वी प्रमाणेच सेनेची युती करुन सत्ता स्थापन करणे भाजपाच्या दृष्टीने उचीत असल्याने भाजप शिवसेनेशी युती करण्यास सकारात्मक आहे. मात्र शिवसेनेने बिनशर्त पाठींबा दिला तरच जिल्हा परिषदेवर युती शक्य असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले. भाजपा हा मोठा भाऊ असल्याने सेनेेने युतीसंदर्भात प्रस्ताव मांडावा यावर भाजपा कोअर कमिटीतर्फे निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कोअर कमिटी बैठकीत निर्णय होणार
20 मार्च रोजी विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असुन 21 मार्च रोजी नवीन अध्यक्षाची निवड होईल. जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे. अध्यक्षपदाच्या निवडीकरीता भाजपातर्फे 19 व 20 मार्च रोजी कोअर कमिटीचे बैठक घेण्यात येणार आहे. कोअर कमिटीच्या निर्णयानंतर अध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल. आठ ते नऊ जणांची नावे अध्यक्षपदासाठी आहे परंतु कोअर कमिटीच्या निर्णयानंतरच अध्यक्ष निश्‍चित केला जाईल. स्वच्छ प्रतिमा, ग्रामिण विकासासाठी रोल मॉडेल ज्यांच्याकडे असेल त्यांनाच अध्यक्षपदाची संधी दिली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले.

पाच जण संपर्कात:
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. शिवसेना भाजपाला सत्ता स्थापनेसाठी मदत करेल हे राज्यातील राजकारणातील घटनाघडामोडीमुळे निश्‍चित नसल्याने भाजप देखील सेनेशी युती करण्यासाठी आग्रही नाही. भाजपाच्या संपर्कात इतर पक्षाचे पाच सदस्य असून त्यांनी बिनशर्त भाजपाला पाठींबा जाहिर केला असल्याने भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असल्याचा गोप्य स्फोट जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला. झेडपी अध्यक्षपदी भाजपाचाच उमेदवार राहिल त्याकरीता सर्व तयारी पुर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या मदतीशिवाय देखील भाजपा सत्ता स्थापन करु शकल्याचे वाघांनी सांगितल्यामुळे युतीच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे.

कॉग्रेसचे उमेदवार संपर्कात
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी गट नोंदणी पुर्ण केली आहे. सदस्य फुटुन जाऊ नये याकरीता गट नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही कॉग्रेसने गट नोंदणी पुर्ण केलेली नाही. त्यामुळे भाजपाच्या संपर्कात कॉग्रेसचे उमेदवार असल्याचे निश्‍चित असून त्यांच्याच मदतीने भाजप सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे. दरम्यान कॉग्रेसचे आर.जी.पाटील हे कॉग्रेस पक्षाशी नाराज असल्याचे चित्र होते. त्यांच्या पत्नी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडुण आल्या आहे. काही दिवसांपासुन ते भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.