शिवसेनेने पुन्हा दंड थोपाटले!

0

मुंबई/पुणे (प्रतिनिधी) – राज्यात गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाचा घास हिरवला गेला आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, कालच राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपीटग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिविभागाला दिले असताना, सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रश्नी जोरदार आंदोलन करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोरील अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर, ठाकरे यांनी भाजपविरुद्ध पुन्हा एकदा दंड थोपाटल्याचे दिसून येत आहे. गारपीटग्रस्तांना मदत मिळत नसेल तर आंदोलन करा, त्यासाठी सर्व तहसील कार्यालयासमोर ठिय्या द्या, असे आदेश ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सरकारच्या मात्र मदतीसाठी हालचाली!
राज्यातील विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कालच दिलेले आहेत. त्यासाठी महसूल व कृषिविभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामे करावेत व विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही त्यांनी तिले आहेत. या गारपिटीत रब्बी हंगामाच्या उभ्या पिकांचे, काढणी पश्च्यात मळणीसाठी ठेवलेल्या धान्यांचे नुकसान झालेले आहे. एकीकडे सरकार मदतीसाठी हालचाली करत असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गारपीटग्रस्तांना तातडीने मदतीसाठी आक्रमक व्हा, असे आदेश शिवसैनिकांसह शिवसेना नेत्यांना दिले आहेत. शेतकर्‍यांना मदत मिळत नसेल तर प्रत्येक तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्याचेही निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत, याबाबत खा. आढळराव यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आपल्याच सरकारविरुद्ध शिवसेनेचे आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कधीही निवडणुकांची शक्यता!
केंद्रात व राज्यात कधीही निवडणुका होण्याची शक्यता पाहाता, शिवसेना नेत्यांनी व शिवसैनिकांनी तयार रहावे, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खा. आढळराव यांनी सांगितले. निवडणुका लागल्यास काम कसे करावे, याबाबतही ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले. मतदारयाद्या अद्ययावत करणे, गावोगावी संपर्क अभियान सुरु करणे, सरकारच्या कोणकोणत्या योजना गावांत पोहोचल्या आहेत याबाबत माहिती घेण्याचे आदेशही ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांसह प्रमुख पदाधिकार्‍यांना व लोकप्रतिनिधींना दिले आहेत. शिवसेनेला 150 जागांची ऑफर भाजपने दिली असल्याची चर्चा निव्वळ थाप असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले असल्याचे खा. आढळराव यांनी सांगितले.

शिवसेनेला 140 जागांची ऑफऱ!
शिवसेनेला स्वबळावर लढण्यापासून परावृत्त करण्यासाठी भाजपने मनधारणी चालविली असून, विधानसभा निवडणुकीत 140 जागा सोडण्याची ऑफर दिली असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. या संदर्भात, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदारासोबत चर्चा केली आहे, असेही सूत्र म्हणाले. सोबत लढलो नाही तर दोघांचेही नुकसान होईल, असेही शहा यांच्याकडून शिवसेनेला सांगण्यात आले. शिवसेनेसोबतच तेलुगू देसम पक्षानेदेखील स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेतृत्व थोडे झुकले आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेनेसोबत आतापासून वाटाघाटी सुरु झाल्याचेही सूत्राने सांगितले.