मुरुड : परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. सत्ता असो व नसो परंतु रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष हा जनतेची कामे करीतच राहणार असून या पक्षाला आमदार सुनिल तटकरे यांच्या सारखा बुद्धिवान नेता असल्याने या पक्षाला निधीची चणचण कदापी भासणार नाही. लोकांची विकास कामे करण्यासाठी निधी कोठून आणावा याचे चांगले ज्ञान अवगत असल्याने राष्ट्रवादी पक्षासोबत असणार्यांीची विकास कामे पूर्ण झालेली असतील परंतु शिवसेनेने विकासाच्या नावावर मते मागू नये कारण या पक्षाकडे अवजड उद्योग मंत्रीपद असून सुद्धा रायगड जिल्ह्यात विकासच काय एखाद्या उद्योग समूहात स्थानिक मुलांना नोकरी सुद्धा लावता आलेली नाही. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी मुरुड येथे केले.
राष्ट्रवादीतर्फे नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा मुरुड येथील माळी समाज गृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, जिल्हा महिला अध्यक्ष दिपीका चिपळूणकर, मुरुड तालुका निरीक्षक फैरोज घलटे, महिला तालुका अध्यक्ष नेहा पाके, हसमुख जैन, अतिक खतीब, स्मिता खेडेकर मियाजानं कादरी, विनायक सोडेकर, किशोर काजारे, जहूर कादरी, निलोफर हमडुले, पंचायत समिती सदस्य आशिका ठाकूर, अनंत ठाकूर, संजय गुंजाळ, तालुका चिटणीस विजय पैर आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याचे पालकमंत्री कोण आहेत हे सुद्धा सामान्य जनतेला माहित नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपली मरगळ झटकून लोकांची कामे करण्यात व्यस्त रहावे पराभव झाला म्हणून खचून जाऊ नये. पक्षाच्या कार्यकारणीत नवीन चेहरे अपेक्षित असून त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे.
मंगेश दांडेकर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस