शिवसेनेने सत्तेसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर बंद करावा: रविशंकर प्रसाद

0

नवी दिल्ली: राज्यातील राजकारणाचा आजचा दिवस अद्भुत आणि अकल्पनीय असा आहे. कोणालाही काही सुगावा नसताना सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शिवसेनेने सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर बंद करावा. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार? अशा शब्दात टीका केली आहे.

ज्या शब्दांचा वापर शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात केला त्याबद्दल आम्हाला खंत आहे. स्वार्थासाठी शिवसेनेने युती तोडली. बाळासाहेबांचा काँग्रेसविरोध प्रामाणिक अन् सर्वश्रूत होता, मात्र शिवसेनेला त्याचा विसर पडला. निकाल हा भाजपाचा नैतिक आणि राजकीय विजय होता असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे बहुमत होते मग त्यांनी राज्यपालांकडे दावा का केला नाही? अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांनी राज्यपालांकडे आमदारांच्या सहीचे पत्र दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या हे सगळं कायदेशीर झाले आहे. विधिमंडळात आम्ही बहुमत सिद्ध करु असेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.