ना. गिरीश बापटांनी शिवसेनेला डिवचले
नागपूर : शिवसेनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा राज्य सरकारला असलेला पाठिंबा काढून घ्यावा. सेनेने पाठिंबा काढून टाकल्यानंतरही फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याची उडविली खिल्ली
प्रसारमाध्यमांशी बोलताना बापट म्हणाले, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेत असतात. आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे ‘ज्येष्ठ नेते’ आहेत. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या संदर्भात ते निर्णय जाहीर करू शकतात, अशा शब्दात त्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. गेल्या काही दिवसांपासून सेना व भाजपमध्ये सौहार्दाचे बंध राहिलेले नाही. सेना व भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असे विधान नुकतेच केले होते. शिवसेनेने पाठिंबा काढून टाकला तरी राज्य सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने आतापर्यंत यशस्वीपणे तीन वर्षे पूर्ण केली आहेत. उर्वरित दोन वर्षाचा कालावधी फडणवीस सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.