मुंबई – महानगरपालिका निवडणूकांमध्ये शिवसेनेला अपेक्षेइतके यश न मिळाल्याने राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारचा ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण व्हावा याकरीता मुंबईचे महापौर पद शिवसेनेला देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असून त्याविषयीची अंतिम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री फडणवीस ठरले आहेत. त्यामुळे यासर्व ठिकाणी युती करायची कि नाही याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आले आहेत. यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीवारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्यासमोर वस्तुस्थिती ठेवली. त्यानुसार मुंबईचे महापौर पद शिवसेनेला देवून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये आणि मुंबई, ठाणे आणि नागपूर वगळता अन्य महापालिकांमध्ये सत्ता स्थापन्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यमान मुंबई महापौर पदाची आणि महापालिकेची मुदत ८ मार्चला संपत असून महापौर पदासाठी अर्ज भरण्याची सुरुवात ६ मार्चपासून होणार आहे. तसेच नेमके याच दिवसापासून राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदासाठी राज्य सरकार आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळणारी सत्ता हातची न घालविण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी अपक्ष नगरसेवकाची करण्यात येणारी जमवाजमव थांबविण्याचे आदेश मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा
मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस हेच जाहीर करणार असून मध्यावधी निवडणूकांना सामोरे जाणे भाजपला राजकियदृष्ट्या परवडण्यासारखे नसल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसचा शिवसेनेला छुपा पाठिंबा ?
मुंबईच्या महापौर पदावरून राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असताना भाजप, शिवसेनेच्या राजकिय भांडणापासून अलिप्त राहण्याच्या स्पष्ट सूचना कॉंग्रेसच्या हायकंमाडकडून प्रदेश कॉंग्रेसला देण्यात आले आहेत. मात्र महापौर पदाच्या निवडणूकीवेळी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
भाजप खजिन्याच्या किल्ल्या ठेवणार!
महापालिकेची स्थायी समिती ही पालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवते. पालिकेच्या खजिन्याच्या या किल्ल्या आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे. महापौर देण्याच्या बदल्यात ही मांडवळ होण्याची शक्यता आहे. तसेच उपमहापौरपदही भाजपच राखणार आहे.