मुंबई । गेल्या निवडणुकीत युती तोडताना खरेतर आम्ही शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. पण त्यांना खूपच जास्त जागा हव्या होत्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेनेबाबत असा गौप्यस्फोट केला. त्यामुळेच युती तुटली, असे जेटली म्हणाले. एका वृत्तवाहिनीला जेटली यांची बजेटनिमित्त विशेष मुलाखत झाली. त्यावेळी जेटली यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नाराजीबद्दलही भाष्य केले.
सेनेचा गोंधळ कायम होता
अरुण जेटली शिवसेनेबाबत बोलताना म्हणाले, शिवसेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाऊकच नव्हते की, त्यांना नक्की किती जागांवर लढायचे आहे. आम्ही त्यांना मोठ्या भावाच्या भूमिकेत स्वीकारायला तयार होतो. मात्र, त्यांचा गोंधळ कायम होता. अखेरीस आम्हाला स्वतंत्र लढावे लागले त्यातून भाजपनेच जास्त जागा मिळवल्या. खरेतर आगामी निवडणुकीतही, वेगळे लढण्याने आम्हाला फायदा होईल, असे मी म्हणणार नाही. माझी इच्छा आहे की एनडीए एकसंघ राहावा.
तेलुगू देसमची नाराजी दूर झाली
चंद्राबाबू नायडू बजेटबाबत नाराज असले, तरी केंद्र सरकार आंधप्रदेश राज्यासाठी स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्यामुळे तेलुगू देसमची नाराजी दूर झाली असल्याची माहितीही जेटली यांनी दिली. याचवेळी त्यांनी शिवसेनेबाबतही भाष्य केले.