जळगाव । निवडणुकीचा खर्च विहीत कालावधीत सादर न केल्यामुळे शिवसेनेचे एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र केल्यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
खर्च सादर न करणे भोवले
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक लढविणार्या उमेदवारांना निवडणूक काळात केलेल्या खर्चाचा तपशिल सादर करावयाचा असतो. विहीत नमुन्यासह खर्चाचा अहवाला सादर करावयाचा असतो. 2017 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील खर्चाचा अहवाल सादर न केल्यामुळे शिवसेनेच्या पारोळा तालुक्यातील वसंतनगर-शिरसोद गटातील जिल्हा परिषद सदस्या रत्ना रोहिदास पाटील व वसंतनगर गणातुन निवडुन आलेल्या पंचायत समिती सदस्या छायाबाई जितेंद्र पाटील यांच्यावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून त्याचा जिल्हा परिषदेतील एक सदस्य कमी झाला आहे.
दोन्ही सदस्य पारोळ्यातील
जिल्हा परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या ही 14 होती. रत्ना रोहिदास पाटील अपात्र झाल्यामुळे आता ही संख्या 13 झाली आहे. तसेच पारोळा पंचायत समितीत शिवसेनेचे तीन सदस्य निवडुन आले होते, त्यापैकी छायाबाई जितेंद्र पाटील अपात्र झाल्यामुळे ही संख्या दोनच राहिली आहे. त्यांच्या अपात्रतेमुळे तालुक्यातील शिवसेनेची ताकद आणखी कमी झाली आहे. पारोळा तालुक्यात शिवसेनेचे दोन झेडपी सदस्य तर तीन पंचायत समिती सदस्य होते. रत्ना पाटील ह्या दळवेल येथील तर छायाबाई पाटील ह्या इंधवे येथील रहिवासी आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 15 ख (1) व कलम 62 (क) अन्वये त्यांच्यावर पाच वर्षाच्या कालावधीकरीता निवडणुक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते रावसाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेची कारवाई केली असली तरी संबंधीत प्रकरणाची शहानिशा करुन कोर्टात जाऊन अपात्रतेच्या कारवाईस स्थगितीसाठी प्रस्ताव दाखल करु.”