शिवसेनेला धक्का; राज्यमंत्री खोतकरांची आमदारकी रद्द

0

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद : स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आमदार होण्यापासून रोखण्यासाठी आकाश-पाताळ एक करणार्‍या शिवसेनेला गुरुवारी जोरदार धक्का बसला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची आमदारकीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविली आहे. न्यायमूर्ती पी. व्ही. नलावडे यांनी हा निर्णय दिला. उमेदवारी अर्ज दाखल करताना तो वेळेनंतर दाखल करण्याची कृती खोतकर यांना भोवली. त्यांच्याविरोधात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

काय आहे नेमके प्रकरण…
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने खोतकर यांची आमदारकी रद्द केली. दरम्यान, या निर्णयावर न्यायालयाने महिनाभराचा स्थगनादेशही असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. तसेच खोतकर यांच्या अर्जात अवलंबितांच्या रकान्याबाबतही एक त्रुटी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत अर्जुन खोतकर यांचा अवघ्या 296 मतांनी विजय झाला होता.