मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदांच्या सत्तेत येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसने शिवसेनेला मदत करण्याबाबतची स्वतःची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेसाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे शिवसेनेचा राज्याच्या सत्तेत सहभाग असला तरी विरोधही पाहायला मिळाला. सरकारविरूद्ध अविश्वासाचा ठराव आणायचा की नाही हे शिवसेनाच ठरवेल. शिवसेनेने ठरवले तरच शक्य आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल अशी शक्यता फार कमी आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशातच फाटतील. त्याच्यावरची शाईसुद्धा सुकून गेली असावी. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपले खिशातील राजीनामे तपासून पहावेत. सत्ताधाऱ्यांकडे 190 सदस्यसंख्या असूनही हे सरकार हतबल आहे, असेही ते म्हणाले.
निर्दयी सरकारने शेतकऱ्यांबाबत योग्य निर्णय घेतला नाही. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. शेतकरी आंदोलन मराठवाड्यापर्यंत सीमित राहिले हे दुर्दैव आहे. शेतकरी आत्महत्त्या, कर्जमाफीबाबत आम्ही अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ, असेही तटकरे यांनी सांगितले.