मुंबई : मुंबईसह अन्य आठ महापालिकातील यश आणि अनेक जिल्ह्यात मारलेली मुसंडी, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. येत्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांचे अधिकार व पंख छाटण्याची खेळी केली जाण्याची मोठी शक्यता आहे. शक्य तितकी सेनेची सरकारमध्ये कोंडी करून सेनेच्या नेतृत्वाला अधिकच डळमळीत करण्याचा चंग आता भाजपाने बांधला आहे. त्यामुळेच युतीच्या राजकारणात सेनेची अधिकाधिक कोंडी होत जाणार आहे. त्यासाठी अत्यंत योजनाबद्ध रितीने मुख्यामंत्री आपली व्युहरचना करीत आहेत.
मुंबई पालिकेत शिवसेनेला अन्य पक्षांच्याही मदतीने सत्ता स्थापन करणे शक्य असले तरी राज्यातील मंत्रीमंडळात टिकून रहाण्यासाठीही शिवसेना अगतिक आहे. त्याच अगतिकतेचा लाभ उठवून मुंबईचे महापौरपद मिळवण्य़ासाठीचा डाव भाजपामध्ये शिजतो आहे. कालपर्यंत राजिनाम्याच्या धमक्या देणार्या सेनेच्या नेत्यांना आता तितकी हिंमत राहिलेली नाही. त्याचाच लाभ उठवित पालिकेत युती व बदल्यात पहिल्यांदा महापौरपद बळकावण्याची तयारी भाजपाने चालविली आहे. मुंबई पालिकेतील सत्ता गेल्यास शिवसेनेची रसद तोडली जाण्याच्या भयामुळे सेनेचे नेतृत्व वाटेल तितकी शरणागती पत्करून आपल्या अटी मान्य करील; असाही आत्मविश्वास भाजपामध्ये आता आलेला आहे.
मुंबईचे महापौरपद पदरात पाडून घेण्यासाठी आता फ़डणवीस सेनेच्या मंत्र्यांच्या खाती व अधिकाराचा दबावासाठी वापर करण्याच्या विचारात असल्याचे सुत्रांकडून समजते. नजिक कुठल्या निवडणूका नसल्याने हातात असलेली सत्तापदे जपण्यासाठी शिवसेना अगतिक होईल आणि भाजपाला महापुरपदही देईल. अन्यथा मुंबईसाठी राज्यातील मंत्र्यांच्या पदावर पाणी सोडण्याची पाळी आणली जाऊ शकते. कारण कुठलाही पक्ष मध्यावधीला सामोरा जाण्याच्या स्थितीत राहिला नसल्याने विधानसभेत बहुमत राखण्याची चिंता मुख्यमंत्र्यांना राहिलेली नाही.