शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करू; कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच मोठा झाल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. दरम्यान शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही पक्षाच्या बैठकीत दोन्ही पक्षामध्ये चर्चा झाली. मात्र शिवसेनेकडून स्पष्टीकरण झाल्यावर निर्णय जाहीर करू असे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस करण्यात आल्याने अहमद पटेल यांनी निषेध व्यक्त केला. केंद्राच्या मनमानी कारभारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असल्याचे अहमद पटेल यांनी आरोप केले. ही लोकशाहीची हत्या असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले मात्र कॉंग्रेसला आमंत्रित न करून राज्यपालांनी भेदभाव केल्याचे आरोप अहमद पटेल यांनी केले.

काल शिवसेनेकडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी अधिकृत संपर्क करण्यात आला. त्यामुळे निर्णय घेण्याला विलंब झाला असे अहमद पटेल यांनी सांगितले. किमान समान मुद्द्यावर चर्चा झाली असून त्यावर शिवसेनेने स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील निर्णय जाहीर केले जाईल असे यावेळी सांगण्यात आले.