शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा ; मुक्ताईनगरात प्रशासनाला निवेदन
मुक्ताईनगर:- अहमदनगर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर तसेच शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येचा निषेध करीत या प्रकरणातील दोषी विधानसभा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे तसेच सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे तहसील प्रशासनाकडे करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
राजकीय द्वेषातून शिवसैनिकांची हत्या
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार हत्या प्रकरण हे भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांनी व इतर राजकीय लोकांनी संगनमताने गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या सहाय्याने घडवून आणले आहे. आरोपींवर 302 सारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप झाल्याने विधानसभा सदस्यांसारखे जनरक्षणाचे उच्च पद भूषविणारे लोक फक्त राजकीय द्वेषातून असे घृणास्पद हत्याकांड घडवीत असल्याने अश्या विधानसभा सदस्यांचे सदस्यत्व त्वरीत रद्द करून सदरील गुन्ह्यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक होवून सदरील प्रकरण अतिजलद न्यायालयात चालवण्यात यावे व दोषींना कठोर शासन व्हावे अन्यथा शिवसेना जिल्हाभरात तीव्र आंदोलने करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतांना तालुकाप्रमुख छोटु भोई, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, अल्पसंख्याक तालुका प्रमुख हारुन मिस्त्री, राजेंद्र हिवराळे, विठ्ठल तळेले, राजेंद्र कापसे, प्रशांत टोंगे, वसंता भलभले, संतोष कोळी, दीपक धुंदले, संतोष माळी, दिपक खुळे, डॉ.सतीष देवरे, शुभम तळेले, शुभम शर्मा, भुषण वानखेडे, साबीर पटेल व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.