शिवाजीनगरच्या ‘पूनम पाटील’ची पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी

0

अत्यंत बिकट परिस्थितीत तयारी

पहिल्यांदा झाली होती कर सहाय्यकपदी निवड

जळगाव – ‘हौसला अपना एैसा रखो की मुश्किले भी शर्मिंदा हो’ या हिंदीतील काही पंक्ती आहेत. त्याचा मराठीत शब्दशः अर्थ घेतला तर आत्मविश्‍वास, जिद्द अशी असावी की समस्या, संकटांनाही त्रास देतांना लाज वाटावी. याच ओळी जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरातील तरुणी पूनम पंढरीनाथ डुकरे (पाटील) हिने सार्थ करुन दाखविल्या आहेत. पूनमने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन दुसर्‍यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत पोलीस उपनिरिक्षकपदाला गसवणी घातली आहे.

शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात पूनम ही तिच्या आईसह वास्तव्यास आहे. तिची आई प्रतापनगरमधील मातृत्व रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. आपल्याप्रमाणे मुलीच्या वाट्याला आयुष्य येऊ नये, तिने मोठे अधिकारी व्हावे, आयुष्यात काही तरी विशेष करून समाजात वेगळे स्थान निर्माण करावे यासाठी पूनमच्या शिक्षणासाठी त्या तसूभरही कमी पडल्या नाहीत.

पूनमने दहावीपर्यंतचे शिक्षण नंदनीबाई हायस्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीला तिने 85 टक्के मार्क मिळवून आपल्यातील हुशारीची चुणूक दाखवून दिली. यानंतर 11 वी, 12 वी बेंडाळे महाविद्यालयातून केले. 12 वीला 78.67 टक्के मिळवून महाविद्यालयातून पूनमने दुसरा क्रमांक पटकाविला होता. यानंतर शासकीय महाविद्यालयात डी.एड. पूर्ण केले.

पूनमनेही आईच्या कष्टाचे चीज केले
आईला उदरनिर्वाहात मदत व्हावी म्हणून पूनमने शिवाजीनगरातील एका शाळेत नोकरी केली. यानंतर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपस्तंभमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन, स्वतःतील आत्मविश्‍वास, जिद्द या जोरावर पूनमने पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात तिची कर सहाय्यकपदी निवड झाली. मात्र, वर्ग 1 श्रेणीतील अधिकारी व्हायचे ध्येय असल्याने पूनम स्वस्थ बसली नाही. यानंतरही तिने अभ्यास सुरु ठेवला. तिने दुसर्‍या प्रयत्नात पोलीस उपनिरिक्षकपदाला (वर्ग 2) गवसणी घातली. ही परीक्षा उत्तीर्ण करुन पूनमने तिच्या आईच्या कष्टाचे चीज केले आहे. भविष्यात पूनमला डेप्युटी कलेक्टर, पोलीस उपविभागीय अधिकारी व्हायचे असल्याचे तिने ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

नगरसेविकेसह नागरिकांकडून सत्कार
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पूनम पाटील हिचा नगरसेविका गायत्री उत्तम शिंदे यांच्यासह नागरिकांतर्फे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरिता नेरकर, सुशिला भावसार, दिनेश पुरोहित, जहांगीर खान, संजय शिपी, उत्तम शिंदे, विनय निंबाळकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.