शिवाजीनगरातील कोट्यवधींच्या वखारीची क्षणात राखरांगोळी

0

मालकांची प्रकृती बिघडली : रहिवाशांसह 40 च्यावर अग्निशमन बंबाचे शर्थीचे प्रयत्न ; दुसर्‍या दिवशी आग कायम ; 2 जेसीबीव्दारे भंगार काढण्याचे काम

जळगाव- शिवाजीनगरातील लाकूडपेठेतील शिवविजय सॉ मिल व शेजारील स्वस्तिक प्लायवुडला शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. तेथील रहिवाशांसह जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या 40 च्या आसपास बंबांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांतर रविवारी सकाळी आग नियंत्रणात आली. डोळ्यासमोर कोट्यवधींच्या वखारीच्या राखरांगोळी होत असल्याचे बघतांना मालक जवाहर पटेल यांची प्रकृती बिघडली होती. दुसर्‍या दिवशी काही प्रमाणात आग सुरुच होती. 2 जेसीबींव्दारे भंगार काढण्याचे काम सुरु होते.  शिवाजीनगरातील लाकूडपेठमध्ये शांतीभाई पटेल यांच्या मालकीचे शिवविजय सॉ मिल ही लाकडांची वखार तर बाजूला त्यांचे बंधू यांच्या मालकीचे स्वस्तिक प्लायवूड नावाचे दुकान होते. शनिवारी रात्री 12 वाजता वखारीला अचानक आग लागली. शिवाजीनगर क्रॉसबार मुळे मनपातसेच इतर जैन इरिगेशनच्या अग्निशमन बंबाना उशीर झाला. यानंतर काही क्षणातच आगीने विक्राळ रुप धारण करत अवघ्या तीन ते चार तासात होत्याचे नव्हते केले. घटनास्थळी विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचार्‍यांसह शिवाजीनगर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
कोट्यवधीचे नुकसान
आगीची माहिती मिळताच जैन इरिगेशन 2, महापालिका यांचे तीन बंब घटनास्थळी पोहचले. त्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने धरणगाव, जामनेर, एरंडोल, पारोळा येथील बंबांना पाचारण करण्यात आले. पहाटेपर्यंत चहूबाजूंनी 40 च्यावर बंबांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आली. माऋ पूर्णतः आटोक्यात आली नाही. दुसर्‍या दिवशी भंगार व प्लायवूड पेटतच होते. या आगीत लाकड, लाकूड कापण्याच्या मशीन, प्लायवुड व त्यांचे लोखंडी रॅक या सामानासह कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
…तर सहाही दुकाने खाक झाली असती
स्वस्तिक प्लायवुडच्या बाजूला खुबचंद सागरमल शाळेपर्यंत एकाच रांगेत एक वखार व त्यानंतर मार्बलचे दुकान आहे. शेजारी असलेल्या विकास जोगळेकर यांच्या वखारीत लाकड असती तर आगीने आणखी भिषण रुप धारण केले असते मात्र याठिकाणी सुदैवाने लाकडे नसल्याने अनर्थ टळला. अन्यथा जोगळेकर यांच्या वखारीसह मार्बल अशी सहाची सहा दुकाने खाक झाली असती.