जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार निमजाई फाऊंडेशनमधील प्रकार
जळगाव : प्रधानमंत्री योजनेच्या पैश्याबददल विचारणा केल्याचा राग येऊन विद्यार्थीनीला संस्थेच्या अध्यक्षासह संचालकाने विद्यार्थीनीला मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील निमजाई फाऊंडेशन येथे घडली. या प्रकरणी विद्यार्थीनीसह आई तसेच अन्य विद्यार्थ्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार केली. तर दुसरीकडे निमजाई फाऊंडेशनच्या संचालिका शितल पाटील यांनी आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचा दावा पत्रकारांशी बोलतांना केला.
गणेश कॉलनी ख्वाजामिया चौक परिसरात निमजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध कोर्स चालविले जातात. डिझायनिंग , शिलाई यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी शिवाजीनगरातील तरूणीने दीड वर्षापासून कोर्स लावला आहे. या उपक्रमात प्रधानमंत्री योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात पडत असतात. शनिवारी या विद्यार्थीनीची परीक्षा होती. पेपर देण्यासाठी ती याठिकाणी आली होती. योजनेचे पैसे खात्यात पडतील का? अशी विचारणा तिने संस्थेच्या अध्यक्षा शितल पाटील यांना केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. पुन्हा विद्यार्थीनी म्हणाली आमचे पासबुकचे झेरॉक्स का घेतली असा सवाल केला. याचा राग येऊन शितल पाटील तसेच संचालक भुषण बक्से यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे.
निमजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध कोर्सचे प्रशिक्षण तरूण तरूणींना दिले जाते. आज या विद्याथीनीचा पेपर होता. त्यामुळे आपण तिला बसू देण्याविषयी सुचना केली होती. तिलाच काय आपण कोणावरही हात उचलत नाहीत. आम्ही संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबवित असतो. कोणाला मारण्याचा धमकाविण्याचा प्रश्नच येत नाही, असे शितल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.