शिवाजीनगरात भरदिवसा घरफोडी ; दागिण्यासह रोकड चार लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव : शिवाजी नगर परिसरातील मकरा पार्क अपार्टमेंटमध्ये खुर्शिद हुसेन मजहर अली(वय 80) यांचे घरातून चोरट्यांनी दागिणे, रोकड असा 4 लाखांचा ऐवज लांबविल्याची केल्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजी नगरातील मकरा पार्क अपार्टमेंटच्या जी विंग मधील 125 क्रमांकच्या फ्लॅटमध्ये खुर्शिद हुसेन मजहर अली(वय 80) हे पत्नी फिजा यांच्यासह राहत आहे. मोहरम निमित्त घरासमोरील मश्जिदमध्ये कार्यक्रम असल्याने ते सकाळी 10 वाजता घराला कुलूप लावून तेथे गेले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत 4 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लंपास करत पोबारा केला. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी 1 वाजता खुर्शिद हुसेन मजहर अली हे पत्नीसह घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले त्यांच्या निदर्शनात आले. यानंतर त्यांनी घरात प्रवेश करत पाहणी केली असता घरातील कपाट तुटलेले होते. कपाटील 4 लाखांचे सोन्याचे दागिणे व रोख 4 हजार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. खुर्शिद हुसेन मजर अली यांने तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले व घटनेबाबत तक्रार दिली.

शेजारीही घरही फोडण्याचा प्रयत्न
चोरट्यांनी खुर्शिद हुसेन मजहर अली यांच्या घरात घरफोडी करत शेजारच्या विंगमधील काई जोहर यांच्या घरातही चोरी करण्याच्या उद्देशाने घराचे कुलूप तोडण्याच प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी मकरा अपार्टमेंट गाठत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून शहरात घरफोडीचे सत्र सुरु असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.