जळगाव। चॉकलेट घेण्यासाठी किराणा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन वर्षीय बालिकेस भरधाव वेगातील रिक्षाने उडवून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी शिवाजीनगर परिसरात घडली. घटनेनंतर युवकांनी आवाज देऊनरिक्षाचालकास थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक रिक्षा घेऊन सुसाटवेगात निघून गेला.
धडक देताच रिक्षाचालक घटनास्थळावरून फरार
शकीलखान कासमखान हे शिवाजीनगर परिसरास कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज दुपारी त्यांची मुलगी साराबी शकीलखान (02) ही चॉकलेट घेण्यासाठी दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. ती चालत असताना भरधाववेगात येत असलेली क्र्रमांक एम.एच.19 व्ही 9039 या रिक्षावरील चालकाने तिला उडविल्याने बालीका फेकली गेली. यात तिच्या डोक्यास मुका मार लागला. ही घटना आज सव्वा चार ते साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील शुक्ला डेअरीजवळ घडली. ही घटना बघीतल्यावर स्थानिक नागरिकांनी चालकास आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला तर काही युवकांनी रिक्षाचा पाठलाग केला. परंतु रिक्षा चालक वेगाने निघून गेला. घटना घडली त्यावेळी पुरूष कोणीही घरात नव्हते. त्यामुळे महिलांनी घटनास्थळी धाव घेऊन बालिकेस उचलून शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र आधी बालिकेस उपचारार्थ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्याचे पोलिसांनी सांगितल्याने बालिकेस सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सिव्हीलमध्ये हलविण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर वार्ड क्रमांक चारमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यावर चालकाने रिक्षा थांबवायला हवी, परंतु चालक निघून गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.