पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास ; जाण्या-येण्यासाठी रेल्वे रुळावरुन वापर
जळगाव– शिवाजीनगर पुलाची जीर्ण अवस्था झाल्यामुळे नवीन उड्डाण पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार मार्ग बंद करुन काम सुरु करण्यात आले आहे. काम पुर्ण करण्यासाठी 18 महिन्याचा अवधी आहे.मात्र गेल्या आठ महिन्यापासून काम संथगतीने सुरु आहे. काम सुरु करण्यापूर्वी बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेजवळ किंवा तहसील कार्यालयाजवळ पर्यायी मार्ग करुन देण्याच्या मागणीसाठी शिवाजीनगरातील रहिवासीयांची मागणी होती. परंतु ही मागणी पुर्ण न झाल्याने शिवाजीनगरातून शहरात येण्या-जाण्यासाठी किमान दहा किलोमिटरचा वळसा घालून यावे लागत आहे. तर शालेय विद्यार्थी किंवा पादचारी रेल्वे रुळावरुन वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक आपला जीव मुठीत धरुन रुळावरुन मार्गक्रमण करीत असल्याने नाहक त्रास होत असल्याच्या तीव्र भावना व्यक्त करुन पुलाचे काम लवकरात लवकर करण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली.
शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवाजीनगर,उस्मानिया पार्क,दालफळ,प्रजापतनगर आणि कांचननगरातील काही भाग या प्रभागात समावेश आहे. या प्रभागात दैनिक जनशक्तिच्या टीमने पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी परिसरातील समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधीविरुध्द रोष व्यक्त केला. अतिवृष्टीमुळे जसे सांगली,सातारा,कोल्हापूर जलमय झाले होते,तसे जळगाव शहर खड्डेमय असल्याची संतप्त भावना जयप्रकाश महाडीक यांनी व्यक्त केली.परिसरात आयुक्तांचा बंगला आहे,माजी नगराध्यक्ष,माजी आमदारांचा बंगला आहे.मात्र सुविधांची वानवा असल्याचे नागरिकांनी सांगितले. साफसफाई होत नाही,गटर स्वच्छ केली जात नाही,रस्त्यात खड्डेच खड्डे आहे.गेल्या 40 वर्षापूर्वी परिस्थिती आहे की काय असे वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले.डांबरी रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्यानेच खड्डे दिसत असल्याचे आरटीआय कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले.
रस्ता बंदमुळे नागरिक त्रस्त
शिवाजीनगर पुलाच्या बांधकामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने एक तर ममुराबाद रस्त्याच्या पुलावरुन आणि सुरत रेल्वे गेटला वळसा घालून शहरात यावे लागत आहे.त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाढला आहे.वेळेचा अपव्यय होत आहे.त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. नवीन पुल बांधण्याचे काम सुरु करण्याआधी बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेजवळ किंवा तहसील कार्यालयाजवळ पर्यायी मार्ग करुन देण्याच्या मागणीसाठी शिवाजीनगरातील रहिवासीयांची मागणी होती.मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. नागरिक रेल्वेच्या दादर्यावरुन येणे जाणे करीत असल्याने विनातिकिट प्रवास करणारे समजून दंडात्मक कारवाई करीत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.तसेच तहसील कार्यालयाजवळील रेल्वे रुळावरुन जाणे- येणे करतांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. आपला जीव मुठीत ठेवून शालेय विद्यार्थी किंवा पादचारी रेल्वे रुळावरुन वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवाजीनगरचे पुल जीर्ण झाल्याने नवीन पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आधी 50 टक्के रेल्वे आणि 50 टक्के मनपा खर्च करण्याबाबत निश्तिच झाले होते.मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे शासनाला सांगितले होते. त्यामुळे पूर्ण निधी शासनाने मंजूर केला.ममुराबाद रस्त्याच्या पुलावरुन पर्यायी मार्ग सुरु केला आहे. नागरिकांना त्रास होतोय यात दुमत नाही.पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आमदार राजूमामा भोळे
शहरातील सर्व प्रभागांमध्ये आम्ही पाहणी करुन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.शहराचे चित्र बदलवायचे असेल तर सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे.मनपा अधिकार्यांनीही प्रभागात फिरुन समस्या सोडवायला पाहिजे.परंतु अधिकारी फिरताना दिसत नाही.स्वच्छतेसंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे.नागरिकांच्या समस्या न सोडविल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचार्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सोमवारी काही कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉ.उदय टेकाळे, आयुक्त,मनपा