शिवाजीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई

0

नियमांचे भंग करणार्‍या 16 हॉकर्सचे स्टॉल सील
पुणे : शिवाजीनगर भागातील प्राईड हॉटेल शेजारील आणि एलआयसी लेनमधील हॉकर्सवर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये प्रमाणपत्र नसणार्‍या आणि अनधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या हातगाड्या आणि खाऊच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या नियमांचे आणि अटीशर्तीचा भंग करणार्‍या सुमारे 16 हॉकर्सचे स्टॉल सील करण्यात आले. तसेच नऊ हॉकर्सच्या स्टॉलवरील साहित्य जप्त करण्यात आले.

परवानाधारकानेच व्यवसाय करणे बंधनकारक

सील करण्यात आलेले स्टॉल्स मूळ परवानाधारकाने भाडेतत्त्वावर दिले होते. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या अटींचा भंग केल्याचे निदर्शनाला आले. महापालिकेचा परवाना ज्यांनी घेतला आहे त्यांनीच तेथे व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र परवानाधारकाने हे स्टॉल्स दुसर्‍याला चालवण्यास दिले होते. त्यामुळे हे स्टॉल्स सील करण्याची कारवाई करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. महापालिकेने याआधीच जाहीर केल्याप्रमाणे अशाप्रकारे स्टॉल्स भाड्याने दिल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय शिवाजीनगर लगत रस्त्यावर अस्वच्छता करणार्‍या इसमावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रस्ता स्वच्छ करून घेण्यात आला तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आल्याचे जगताप यांनी नमूद केले.