शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी 451 कोटींची तरतूद

0

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत पीएमआयरडीएच्या 799 कोटी 65 लाख 93 हजार रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी 451 कोटी रुपयांची तरतूद यात करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवडला वळसा घालणार्‍या देशातील सर्वोत्तम बाह्यवळण रस्त्याची निर्मिती करणार आहे. तसेच, हा बाह्यवळणमार्ग इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सरकारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पीएमआरडीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. 2016-17 या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिलकेसह 572 कोटी 68 लाख रुपये जमा दाखविली होती, तर 318 कोटी 54 लाख रुपये खर्च दाखविण्यात आला होता. 452 कोटी 52 लाख रुपयांचा निधी शिल्लक होता. 2017-18 च्या अर्थसंकल्पात शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पासाठी 451 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2017-18 या चालू वर्षीच्या आरंभी गतवर्षीची शिल्लक व चालू वर्षीची अपेक्षित 347 कोटी 13 लाख रुपये असे दोन्ही मिळून 799 कोटी 65 लाख 93 हजार रुपयांचा अर्थसंकल्प आजच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यास या सभेत मंजुरी देण्यात आली.

हिंजवडी मेट्रो पीपीपी तत्वावर

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प 23.3 कि.मी.चा राहणार असून, यासाठी सार्वजनिक व खासगी भागीदारीचा (पीपीपी) पर्याय अवलंबण्यात येणार आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि रामवाडी ते वनाज मेट्रो महामेट्रोच्या अंतर्गत करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच शहरातील मेट्रो प्रकल्पांसाठी दोन धोरणांचा अवलंब का करण्यात येत आहे, अशी विचारणा करण्यात येत आहे.

नगररचना योजनांसाठी 35 कोटी
पीएमआरडीएच्या क्षेत्रांतर्गत विशेष डाटाबेस डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 25 कोटी 12 लाख, तर नगररचना योजनांसाठी 35 कोटी व विकास योजनेसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम-2016 नुसार स्थानिक प्राधिकरण आणि नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रात अग्निशमन केंद्र स्थापन करणे व कार्यान्वित करण्यासाठी अग्निशमन शुल्काद्वारे 35 कोटी रक्कम जमा अपेक्षित असून, 15 कोटींच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी
प्राधिकरणासाठी अत्याधुनिक पद्धतीचे आभासी कार्यालय तयार करण्यासाठी 5 कोटी, खासगी व परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी 17 लाख, पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी 20 कोटी आणि येरवडा येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद यात करण्यात आली आहे. प्राधिकरणासाठी प्रकल्प अंमलबजावणीसाठी तात्पुरत्या कार्यालयाच्या बांधकामासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

देशातील सर्वोत्तम बाह्यवळण रस्ता
पीएमआरडीए विकसित करीत असलेला बाह्यवळण रस्ता 128 कि.मी.चा असून, पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला वळसा घालणारा आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी 146 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून हा रस्ता विकसित केला जाणार असून, अ‍ॅग्रो व टुरिस्ट बेस असणारा शिवाय औद्योगिक विकासाला चालना मिळणारा आहे. पीएमआरडीएने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या रस्त्याचे नियोजन केले असून, देशातील सर्वोत्तम बाह्यवळण रस्ता म्हणून ओळखला जाईल. हा मार्ग तयार करत असताना सर्व बाबींचा विचार केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले.

बाह्यवळणसाठी संयुक्त समिती
राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीएची संयुक्त समिती करण्यात आली आहे. बाह्यवळण रस्ता तयार करताना ओव्हर लॅपिंग होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पीएमआरडीएचा नगर रचना विभाग सक्षम असावा, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

बाह्यवळण मार्ग सिग्नलमुक्त
महेश झगडे यांनी बैठकीत सादरीकरण केले. बाह्यवळण रस्ता आठ लेनचा व 110 मीटर रुंदीचा असेल. हा मार्ग पूर्णपणे सिग्नल मुक्त असेल. रस्त्याच्या निर्मितीप्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोनही समोर ठेवला जाणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीतही वाढ होईल. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी नियमाद्वारे मार्ग काढण्याचे काम सुरु आहे, असे झगडे यांनी सांगितले.

नदी सुधारणेसाठी 10 कोटी
इंद्रायणी नदी सुधारणेसह मुळा, मुठा नदी सुधारणेसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्राधिकरणाच्या क्षेत्रातील 7 गावांसाठी पाणीपुरवठा योजना खासगी सहभागातून कार्यान्वित केली जाणार आहे. पीएमआरडीएच्या संपूर्ण क्षेत्राचा एरिअल सर्व्हे पूर्ण झाला आहे, असे झगडे यांनी सांगितले. त्यावर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राच्या एरिअल सर्व्हेसाठी तीच एजन्सी नेमता येईल का ते पाहावे, अशी सूचना बापट यांनी केली.

आदर्श गावांसाठी तरतूद करावी
बाह्यवळण मार्ग करताना जोड रस्तेही घेण्याची तरतूद करावी. शहरासमवेतच आदर्श गाव होण्यासाठी निधीची तरतूद करावी. पीएमआरडीएत लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम होईल, याची दक्षता घ्यावी. बाह्यवळण मार्गावर दर 15 कि.मी. वर विश्रांतीगृह, रुग्णालयांची तरतूद व्हावी. पूर्वी दाखवण्यात आलेल्या बाह्यवळण मार्गात आता काही ठिकाणी एमआयडीसी, तसेच काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसी वगळता इतर अतिक्रमणे काढण्याबाबत योग्य तो मार्ग अवलंबण्यात यावा, अशा सूचना बापट यांनी केल्या.

यांची होती उपस्थिती
पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पीएमआरडीएचे सदस्य सचिव तथा महानगर आयुक्त महेश झगडे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके उपस्थित होते.