शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला केंद्राची मंजुरी

0

पुणे । पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल 23 किमी लांबीच्या मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. शहरातील बहुचर्चित मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर आहे. त्यातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असतील.

2021मध्ये प्रकल्प कार्यान्वित
या प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार 1 हजार 137 कोटी रुपये देणार आहे. तर राज्य सरकारचा हिस्सा 812 कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. 2021 मध्ये 2 लाख 61 हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

एका वेळी 764 प्रवासी करतील प्रवास
सार्वजनिक व खासगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पीएमआरडीए यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. तो डिसेंबर 2016 मध्ये पीएमआरडीएच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी 48 महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी 764 प्रवासी प्रवास करू शकतील.