आळंदी : ज्ञानोबा-माउलींचे जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीत हरिनाम गजरात 32 दिवसांच्या प्रवासानंतर अलंकापुरीत बुधवारी प्रवेशला. आषाढी एकादशी दिनी दिंड्यांच्या हजेरीच्या कार्यक्रमांनी गुरुवारी (दि.20) हरिनाम जयघोषात सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रींचे पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त स्वागत आणि आळंदीत विकसित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा स्मारकाचे लोकार्पण सोहळा हरिनाम गजरात पुष्प वृष्टीने माउली भक्त व शिवभक्तांचे उपस्थितीत हभप मारुती महाराज कुर्हेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्रींची आरती, भक्ती-शक्तीचे घोषणांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपाध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी राम गावडे, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, सुरेश झोंबाडे,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य, आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी उपस्थित होते. यावेळी स्मारक परिसरासह मंदिरात पुष्प सजावट करून भाविकांनी सेवा रुजू केली.
पंढरपूरहून परतीच्या प्रवासात असलेला पालखी सोहळा पुण्यातील दोन दिवस पाहुणचार घेत श्रीची पालखी पुण्यातून येरवडामार्गे आळंदीकडे सकाळी निघाली. आळंदी पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील तसेच परिसरातील ग्रामस्थांनी दुपारी चारपासूनच धाकट्या पादुकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आळंदी देवस्थानच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे सोहळ्याचे मानक-यांचे नारळ प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले.व्यवस्थापक माउली वीर आदींनी नियोजन केले.
श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा
गुरुवारी (दि.20) एकादशी असल्याने माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी सकाळी साडेअकरा च्या सुमारास मंदिरातील देऊळवाड्यातून बाहेर येईल.हजेरी मारुती मंदिरात बारा वाजता दिंड्यांची हजेरी होणार आहे.येथे प्रथेने दिंड्याची हजेरी नारळ प्रसाद वाटप होणार आहे.