शिवाजी नगरात किराणा दुकान फोडले : चोरट्यांनी लांबवली 90 हजारांची रोकड

जळगाव : शिवाजी नगरातील क्रांती चौकात चोरट्यांनी किराणा दुकान फोडत दुकानातील तब्बल 90 हजारांच्या रोकडवर डल्ला मारला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शटर उचकावून लांबवली रोकड
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात आनंद मदनलाल नागला यांचे ‘मदनलाल पांडुरंग नागला’ या नावाने किराणा दुकान आहे. शुक्रवार, 1 जून रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करीत घर गाठले व शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते दुकानावर आले असता त्यांना दुकानाचे शटर मध्यभागून उचकविलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ दुकानात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना गल्ल्यातून पैसे चोरी झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
चोरट्यांनी नागला यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 85 हजारांची रोख रक्कम व पाच हजारांची चिल्लर मिळून 90 हजारांची रोकड लांबवली. नागला यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आनंद नागला यांच्या तक्रारीवरुन शनिवार, 2 जून रोजी दुपारी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.