मुंबई । दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. पण सतत पडणार्या पावसामुळे सध्या अनुयायांचा खोळंबा झाला आहे. महापालिकेने अनुयायांसाठी शिवाजी पार्कात बांधलेले मंडप उखडले असून, मैदानात चिखलही साचला आहे. एवढंच नव्हे, तर महापालिकेने अनुयायांना राहण्याची पुरेशी सोय उपलब्ध न केल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सोयी-सुविधादेखील अपुर्या पडल्याचे चित्र येथे दिसत आहे. या सर्व प्रकाराने आंबेडकर अनुयायी प्रचंड नाराज झाले असून, पर्यायी राहण्याच्या व्यवस्थेची मागणी करत आहेत.
मैदानात जागा नाही
मध्य प्रदेश, उ. प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राज्याच्या कानाकोपर्यातून अनुयायी दादर रेल्वेस्थानकावर उतरत आहेत. त्यातील बहुतांश अनुयायी शिवाजी पार्क मैदानाकडेच मोर्चा वळवत आहेत. परंतु, मंडप उखडल्याने त्यांना कोसळणार्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मैदानात चिखल झाल्याने त्यांना उभं राहण्यासाठीही जागा उपलब्ध नाही.
दर्जेदार सुविधा देण्याची मागणी
महापालिकेने त्यांची राहण्याची व्यवस्था माटुंगा, माहीम, धारावीतील शाळा आणि सामाजिक केंद्रात केली आहे. ही जागाही दूर आणि अपुरी असल्याने त्याचा अनुयायांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजी पार्कासमोरच वनिता मंडळ, सावरकर सभागृह असताना इतक्या लांब राहण्याची व्यवस्था का केली, असा प्रश्न विचारून महापालिकेने दर्जेदार सुविधा देण्याची मागणी केली आहे.
काहीही झाले, तरी दर्शन घेणार
किमान दीड लाखांपर्यंत अनुयायी सहज चैत्यभूमीवर दाखल होतील, असा अंदाज रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश जाधव यांनी व्यक्त केला. बहुतांश अनुयायीदेखील कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, तरी स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊच, असा निर्धार व्यक्त केला आहे.