खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे आवाहन
चाळीसगाव – आजच्या शिक्षण पध्दतीमधून शिवरायांचा जाज्वल इतिहास तुमच्या आमच्या पुरेसा पर्यंत पोहचला नाही. यासाठी वेळ काढून रायगड सह सर्वच किल्ल्यांना भेट द्या. त्यातून छत्रपतींचा संस्कार समजाऊन घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली रणनीती आजही श्रेष्ठ आहे. जम्मू काश्मीर वर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानची नितीमत्ता अजूनही बदललेली नाही ती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शिवरायांच्या रणनीतीने पाकिस्तानला उत्तर देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन खासदार तथा कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे केले.
यांची होती उपस्थिती
चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सिग्नल चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ए.टी. पाटील तर आमदार उन्मेष पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, ज्येष्ठ नेते उदेसिंग पवार, महिला आयोगाच्या देवयानी ठाकरे, जि.प. सभापती पोपट भोळे, भाजप तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील उपस्थित होते. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी प्रास्तविक केले.
श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले पुढे म्हणाले की, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्या बरोबर सारा देश नतमस्तक होतो.मग चाळीसगावात शिवरायांच्या पुतळ्यासाठी पालिकेला ३० वर्षे लागली. या नाकर्तेपणाबद्दल नाराजी व्यक्त करून आम्ही आता फकत पुतळ्याच्या प्रश्नावरच नाही तर आपली अस्मिता असलेल्या गड किल्ले संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आणि प्रलंबित महाराजाच्या पुतळ्यासाठी गेली ३० महिने अहोरात्र काम करणाऱ्या आमदार उन्मेष पाटील यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. यावेळी हजारो शहरवासीय उपस्थित होते. तालुक्यातील १०८ गावे व १७ प्रभागातून आणलेले पवित्र माती भरलेले कलश नियोजित जागेवर टाकून भूमिपूजन करण्यात आले.
विविध संघटनांचा सहभाग
यावेळी संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, रयत सेनेचे गणेश पवार, बौद्ध महासभेचे धर्मभूषण बागुल, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, यांचे पुतळा उभारणीसाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनासाठी तर पुतळा जागा डी नोटीफाईड करण्यात मदत करणारे मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील, राजगडावरून पवित्र माती कलश आणणारे सतीश पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला.