शिवाजी महाराजांच्या 32 मण सुवर्ण सिहांसनासाठी मदत करा

0

आळंदी : हिंदूंनी अर्पण केलेल्या मदतीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे 32 मण वजनाचे वैभवी सुवर्ण सिंहासन रायगडावर पुर्नस्थापना करून विकसित करण्यात येणार असून, यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे, असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी आळंदीत केले. शिव हिंदू प्रतिष्ठाण हिंदुस्थान खेड तालुका यांच्यातर्फे भिडे गुरूजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो भाविक, वारकरी आणि शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या नाम जयघोषाने परिसर दुमदुमला.

संभाजी भिडे गुरुजी म्हणाले की, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सुवर्ण सिंहासन विकसित करण्याचा संकल्प शिवभक्त हिंदूंनी सर्वांच्या सहकार्याने केला असून, तो लवकरच पूर्णही केला जाईल. बत्तीस मणांचे सुवर्ण सिंहासन उभे करून त्यावर 60 किलो वजनाची छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती स्थापित करण्यात येणार असून, त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.

शिवनीतीचा वापर हवा
देशात देशद्रोह आणि स्वार्थीपणाची भावना वाढत असून, गुन्हेगारी वाढत आहे. याला पायबंद घालण्यासाठी शिवनीतीचा वापर करण्याची गरज आहे. राष्ट्रीयत्वाची भावना मनात येण्यासाठी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची गरज आहे. शिवाजी आणि संभाजी समजले तरच देश सुरक्षित होईल.

गडकोट मोहिमेत सहभागाचे आवाहन
यावेळी गडकोट मोहिमेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भिडे गुरूजी यांनी केले. तसेच अनेक शिवभक्तांनी मदतीचे धनादेश जमा करून कर्तव्य निधी देत 32 मण सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापना कार्यास गती देण्यास प्रारंभ केला. निधीचे धनादेश हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापना न्यास, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सांगली येथील चालू खाते क्रमांक 60288981247, बँक ऑफ इंडिया शाखा सांगली येथील चालू खाते क्रमांक 160920110000302 तसेच, अक्सिस बँक बचत खाते क्रमांक 917010053235835 येथे जमा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.