लखनऊ । शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंग हेच खरे हिरो असून, बाबर अकबर हे घुसखोर आहेत. हे सत्य एकदा आपण मान्य केले की देशातील सर्व समस्यांवर उपाय सापडण्यास सुरूवात होईल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. बाबर, अकबर ही सम्राट मंडळी केवळ घुसखोर होती. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही तसेच, भरताच्या जडणघडणीत त्यांचे काहीच योगदान नाही, असे सांगतानाच जो समाज आपल्या इतिहासाचे संवर्धन करु शकत नाही, तो आपल्या भूगोलाचेही संरक्षण करु शकत नाही, असेही आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.
देशाचे खरे गुरू आणि हिरो असलेल्या महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा गौरव व्हायला हवा. देशातील नागरिकांनी खर्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातून प्रेरणा घेतली तर, आयएसआय, आयसीससारख्या संघटनांची मुळीच भीती वाटणार नाही, असेही आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंगदेखील उपस्थित होते. राज्यपाल राम नाईक यांनी या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर केलेल्या कामाचे कौतुक केले. आदित्यनाथ यांच्या कामाची दखल देशभरात घेतली जात असून त्यांच्या धडाकेबाज कामाचे देशभरातून कौतुक सुरू असल्याचेही राम नाईक यांनी म्हटले.